Vidya Balan On Addiction After Dirty Picture: मनोरंजनसृष्टीमध्ये वेगळ्या भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणून विद्या बालनचं नाव आवर्जून घेतलं जातं. विद्याचा 'डर्टी पिक्चर' चांगलाच गाजला. मात्र या चित्रपटानंतर विद्याला एक विचित्र व्यसन लागल्याचा खुलाचा तिनेच केला आहे. विद्या नेमकं काय म्हणाली आहे पाहूयात..
मनोरंजन सृष्टीबद्दल अनेकदा दुरुन डोंगर साजरे असं म्हटलं जातं. म्हणजेच दुरुन हे जग आकर्षक वाटत असलं तरी इथे अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांचे दुष्परिणामही आहेत. त्यातही कलाकारांना अनेकदा अशी काही पात्र साकारावी लागतात की ज्यामुळे त्यांच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यावर दिर्घकालीन परिणाम होतो. प्रसिद्ध अभिनेत्री विद्या बालनही यामधून सुटलेली नाही.
विद्याने अनेक चरित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे. मात्र तिने 'डर्टी पिक्चर'मध्ये साकारलेली सिल्क स्मिताची भूमिका चांगलीच गाजली होती.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विद्याने या चित्रपटाचा तिच्या आयुष्यावर कसा परिणाम झाला याबद्दल भाष्य केलं आहे. या चित्रपटामध्ये विद्या अगदीच बोल्ड आणि बिनधास्त अवतारातील कॅरेक्टरमध्ये दिसली.
विद्याने 'डर्टी पिक्चर'मध्ये बोल्ड सीनबरोबरच काही धुम्रपान करतानचे सीनही दिले आहेत.
विद्याचा बोल्ड सीनला नकार नव्हता मात्र सुरुवातीला स्मोकिंग करण्यासंदर्भात तिचा आक्षेप होता. कॅमेरासमोर स्मोकिंग करणं तिला कठीण जात होतं. मात्र नंतर तिला या चित्रपटाच्या शुटींगदरम्यान सिगारेटचं व्यसन लागलं.
समदीशच्या 'अनफिल्टर्ड' या युट्यूबवरील विशेष कार्यक्रमामध्ये विद्याने यासंदर्भात 'डर्टी पिक्चर'चा उल्लेख करत खुलासा केला. "मी यापूर्वीही चित्रपटांसाठी धुम्रपान केलं आहे. धुम्रपान कसं करतात मला ठाऊक आहे. मात्र मी 'डर्टी पिक्चर'आधी प्रत्यक्षात कधीच धुम्रपान केलं नव्हतं. फक्त ते काय असतं याची पूर्ण कल्पना मला होती," असं विद्या म्हणाली.
"मात्र पात्र साकारताना तुम्ही कोणतीही गोष्ट खोटी खोटी किंवा नक्कल वाटेल अशापद्धतीने पडद्यावर दाखवू इच्छित नाही. मला सुरुवातीला हे अवघड वाटत होतं कारण पूर्वी धुम्रपान करणाऱ्या महिलांबद्दल उलट सुलट विचार केले जायचे. मात्र आता असं काहीही नसून ही परिस्थिती फार पूर्वी होती," असंही विद्याने 'डर्टी पिक्चर'मधील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना नमूद केलं.
आता तू धुम्रपान करते का? असा प्रश्न विद्याला विचारण्यात आला. यावर विद्याने, "नाही! मी हे कॅमेरावर सांगावं की नाही मला कळत नाही मात्र मी धुम्रपान करणं एन्जॉय केलं," असं उत्तर दिलं.
"तुम्ही मला सांगितलं की सिगारेटमुळे आरोग्याला कोणताही तोटा होत नाही तर मी स्मोकर झाले असते. मला त्या धुराचा वास फार आवडतो," असं विद्या म्हणाली.
या धुराबद्दल आपल्याला आकर्षण असल्याचं सांगताना विद्याने, "कॉलेजच्या दिवसांमध्ये मी बस स्टॉपवर धुम्रपान करणाऱ्या पुरुषांच्या बाजूला बसायचे," असंही तिने सांगितलं.
"मला 'डर्टी पिक्चर'च्या वेळेस याचं (धुम्रपानाचं) व्यसन लागलं होतं. मी दिवसातून 2 ते 3 वेळा सिगारेट ओढायचे," असा खुलासाही विद्याने चित्रटाच्या शुटींगच्या दिवसांबद्दल सांगताना केला.