Water frost on mars : मंगळ ग्रहाविषयीचे अनेक अनपेक्षित खुलासे आजवर आपल्यासमोर आले आहेत. यामध्ये आता आणखी एका भारावणाऱ्या निरीक्षणाची भर पडली आहे.
संपूर्ण जगात अवकाश आणि त्यासंबंधीच्या या निरीक्षणामध्ये NASA कडून सातत्यानं अशी माहिती समोर आणली जाते, जी पाहून अनेकांनाच विश्वास ठेवणंही कठीण जातं.
असं खरंच असू शकतं का? हा अनेकांचाच प्रश्न असतो. अशा या नासानं पुन्हा एकदा एक अद्भूत गोष्ट जगासमोर आणली आहे. ही गोष्ट म्हणजे मंगळावर असणारे बर्फाचे साठे.
नासानं प्रसिद्ध केलेल्या फोटो आणि माहितीनुसार मंगळावर असणाऱ्या काही सर्वाधिक उंचावरील ज्वालामुखीपाशी पाण्यापासून तयार झालेला बर्फ/ बर्फसदृश्य पदार्थ पाहण्यात आला आहे.
मंगळावरील थारसीस ज्वालामुखीपाशी ही गोष्ट आढळली असून, मंगळाच्या विषुववृत्तापाशी असल्याचं सांगितलं जात आहे.
मंगळावर पाण्यापासून तयार झालेला हा बर्फ आढळण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी फार आधीच नाकारली होती. पण, उत्तर आणि दक्षिण ध्रुवापुरताच बर्फ सीमित नाही हे आता या फोटोंमुळं सिद्ध होत आहे.
मंगळावर सध्याच्या घडीला साधारण 150,000 टन इतक्या पाण्यापासून तयार झालेला Water Frost असून त्याचं क्षेत्रफळ ऑलिम्पिक खेळांमध्ये असणाऱ्या 60 जलतरण तलावांइतकं असल्याचं सांगितलं जात आहे.
मंगळावरील ज्वालामुखीसंदर्भात झालेला हा उलगडा आहे की नाही, थक्क करणारा? (सर्व छायाचित्र सौजन्य- नासा)