Difference Between Amantran And Nimantran : सध्या लग्नसोहळे आणि समारंभांचा माहोल सुरु असून यानिमित्ताने तुम्हाला अनेक कार्यक्रमांची आमंत्रण दिली जात असतील. या दरम्यान तुम्ही आमंत्रण आणि निमंत्रण असे २ शब्द ऐकले असतील. हे शब्द ऐकायला जरी एक सारखे वाटत असले तरी त्यांचा अर्थ मात्र वेगळा आहे.
आमंत्रणाबाबत बोलायचं झालं तर सामान्यपणे आमंत्रण हे अशा कार्यक्रमांसाठी दिलं जातं ज्याची रूपरेषा ठरलेली नसेल आणि कार्यक्रमाला बोलावल्यावर तुम्ही कधीही तुमची उपस्थिती दर्शवू शकता.
एखाद्या कार्यक्रमाचं आमंत्रण दिल्यावर त्या कार्यक्रमाला जायचं की नाही हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. यासाठी कोणत्याही आग्रह केला जात नाही. म्हणजेच आमंत्रण अशा कार्यक्रमांचं दिलं जात जिथे तुम्ही उपस्थित राहिलात अथवा उपस्थित राहिला नाहीत तरी कार्यक्रम संपन्न होणार असतो.
आमंत्रण हे विशेषतः लग्नाचं रिसेप्शन, वाढदिवसाची पार्टी, मित्र मैत्रीणी किंवा अन्य कोणालाही घरी जेवायला येणं किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलावणे यासाठी दिलं जातं.
निमंत्रणाबाबत बोलायचं झाल्यास ज्या कार्यक्रमांचं निमंत्रण दिलं जातं अशा कार्यक्रमांमध्ये वेळेवर उपस्थित राहण्याचे बंधन असते. निमंत्रण दिलेल्या कार्यक्रमांची रूपरेषा ठरलेली असते.
निमंत्रण हे विशेष असतं जे फक्त महत्वाच्या व्यक्तींनाच दिलं जातं. कार्यक्रमात पाहुण्याची हजेरी अत्यावश्यक असते किंवा त्या पाहुण्याच्या हजेरीशिवाय कार्यक्रम पार पडणारच नाही अशी परिस्थिती असते तेव्हा निमंत्रण देतात.
तुम्हाला एखाद्या कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालं आणि जोपर्यंत तुमच्याकडे कोणतेही ठोस कारण नसेल तोपर्यंत तुम्ही या निमंत्रणाला नाही म्हणू शकत नाही.
निमंत्रण हे विशेषतः एखाद्या महत्वाच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांना दिलं जातं. तसेच मुंज आणि लग्नसमारंभाच्या कार्यक्रमांना देखील निमंत्रण दिलं जातं. ज्या कार्यक्रमांचा मुहूर्त ठरलेला असेल अशा कार्यक्रमांचे निमंत्रण पाठवले जाते. (इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)