Facts : एखाद्याचा वाढदिवस असो किंवा मग एखादं सेलिब्रेशन... आनंदाच्या अनेक प्रसंगी केक कापण्याचा पायंडा अनेक ठिकाणी पाडण्यात आला आ...
Black Forest Cake : वाढदिवसापासून सहजच केक खावासा वाटतोय म्हणणाऱ्यांची पसंती असते ती म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट या फ्लेव्हरच्या एका विशिष्ट चवीच्या या केकला. मागील काही वर्षांमध्ये Pastry Chefs कडून विविध चवींचे केक तयार करण्यात आले. पण, या साऱ्यांमध्ये ब्लॅक फॉरेस्ट मात्र आपली जागा टिकवून आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
ब्लॅक फॉरेस्ट केक म्हटलं तर, डार्क चॉकलेटचा केक... असाच अनेकांचा समज असतो. पण, प्रत्यक्षात मात्र व्हाईट क्रिम, चेरी आणि चॉकलेट यांची सांगड घालून तयार करण्यात आलेला केक म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट. जंगलाशी साधर्म्य असणाऱ्या या केकचं हे नाव कसं पडलं माहितीये?
असं म्हटलं जातं, की या केकला पहिली ओळख 1500 च्या दशकामध्ये मिळाली होती. हा तोच काळ होता जेव्हा युरोपात पहिल्यांदाच चॉकलेट तयार करण्यात आलं होतं. असं म्हणतात की, त्या काळात हे चॉकलेट जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्ट येथे तयार करण्यात आलं होतं. हे तेच ठिकाण होतं जे तेथील आंबट चेरी आणि किर्शवासेर नावाच्या चेरीपासून तयार करण्यात आलेल्या ब्रँडीमुळं ओळखलं जात होतं.
आणखी एका प्रचलित कथेनुसार या केकमध्ये वापरण्यात येणाऱ्या लालबुंद चेरी जर्मन टोपीवर असणाऱ्या पोमपोमसारख्या दिसत होत्या, त्यामुळंही या केकला ब्लॅक फॉरेस्ट असं म्हटलं जात होतं. शब्दश: अर्थ घ्यायचा झाल्यास ब्लॅक फॉरेस्ट म्हणजे एक अंधकारमय आणि घनदाट जंगल.
जगभरात असणाऱ्या काही अद्वितीय जंगलांपैकी एक म्हणजे ब्लॅक फॉरेस्ट. हे जंगल अतिशय सुंदर आणि रहस्यमयी असून, तिथं वृक्षांची दाटी इतकी आहे, की जंगलातील भूभागावर सूर्यकिरणं सहजगत्या पोहोचूच शकत नाहीत. जर्मनीमधघ्ये असणारं हे जंगल समुद्रसपाटीपासून 4898 फूट उंचीवर आहे. या जंगलात गेलं असता भर दिवसाही रात्रीचाच भास होतो, ज्यामुळं ते ब्लॅक फॉरेस्ट म्हणून ओळखलं जातं.
ब्लॅक फॉरेस्ट हा परिसर प्रत्यक्षात इतका सुंदर आहे की, या भागाला युरोपातील स्वित्झर्लंड असंही म्हणतात. घनदाट जंगल, उंचच उंच पर्वत, देवदार वृक्ष, खळाळून वाहणारे झरे अशा गोष्टी या जंगलाच्या सौंदर्यात आणखी भर टाकतात. या जंगलातून वाहणारी किजिंग नदी येथील निसर्गसौंदर्यात आणखी भर टाकते.
जर्मनीतील या जंगलाचाच संबंध ब्लॅक फॉरेस्ट केकशी जोडला जातो. अनेक केक बेकरीजमध्ये जर्मन ब्लॅक फॉरेस्ट केक अशा नावानंही केक विकला जातो. जिथं मूळ केकशी मिळताजुळता केक तयार करण्याचा प्रयत्न शेफ, बेकर करताना दिसतात.