Indian Population : संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या अहवालानुसार, लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकल्याची बातमी बुधवारी समोर आल्यानंतर देशात काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. तर काहींना या आकडेवारीवरुन खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. मात्र या वाढलेल्या लोकसंख्येचा काही प्रमाणात भारताला फायदा होणार आहे.
युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (यूएनएफपीए) या संस्थेने स्टेट ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023 प्रसिद्ध केला असून यामध्ये भारत चीनला मागे टाकत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. यासह भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे.
भारताच्या लोकसंख्येत पुढच्या तीन दशकात वाढ होत राहणार असून 30 वर्षांनंतर यामध्ये घट होण्यास सुरुवात होणार आहे, असा अनुमानही संयुक्त राष्ट्रांच्या संस्थेने लोकसंख्या अहवालात लावला आहे. (फोटो - Reuters)
या अहवालानुसार भारतामध्ये 15 ते 64 या कमावत्या वयोगटातील नागरिकांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 68 टक्के आहे. तर शून्य ते 14 या वयोगटात 25 टक्के, 10 ते 19 वयोगटात 18 टक्के, 10 ते 24 वयोगटात 26 टक्के भारतीय नागरिक आहेत. 65 वर्षांवरील नागरिकांचे प्रमाण फक्त सात टक्के आहे.
दुसरीकडे, चीनची लोकसंख्या कमी होत असल्याचेही म्हटले जात आहे. तसेच या अहवालाने चीनसह जगातील अनेक देशांचे टेन्शन वाढलं आहे. या अहवालावरुन भारताची लोकसंख्या वाढणं ही फार मोठी कामगिरी नसल्याचे चीनने म्हटले आहे. फक्त लोकसंख्या वाढून फायदा नाही, दर्जाही असला पाहिजे असा टोला चीनने लगावला आहे.
जगभराचं टेन्शन वाढवून भारत मात्र वाढलेल्या लोकसंख्येवर खूश आहे. याचे कारण म्हणजे वाढलेल्या लोकसंख्येमुळे स्वस्तात मिळणारे मजूर. स्वस्त मजुरांच्या जोरावर भारत चीनला मागे टाकण्याची शक्यता आहे.
चीनने अनेक वर्षांपासून एक मूल धोरण स्विकारले होते आणि त्यानंतर चीनची लोकसंख्या सातत्याने कमी होत आहे. चीनच्या घटत्या लोकसंख्येचा परिणाम स्थानिक पातळीसह जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्थेवरही होण्याची शक्यता आहे. यामुळे जगभरातील अर्थतज्ज्ञ चिंतेत आहेत.
चीनमध्ये कमावणाऱ्या वयोगटातील लोकांची लोकसंख्या मोठी आहे. त्यामुळे चीनचा वेगाने विकास झाला आहे. चीनने स्वस्त मजुरांच्या जोरावर उत्पादित माल जगभर निर्यात केला आहे. पण आता तिथली लोकसंख्या कमी झाल्याने चीनसह जगाचे टेन्शन वाढलं आहे. कारण उत्पादनावर परिणाम झाल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.