Sanjay Dutt Threw 1.5 Crore In Sea: सलमान खान आणि संजय दत्त यांची मैत्री जगजाहीर आहे. मात्र एकदा संजय दत्त सलमानवर एवढा संतपाला होता की त्याने चक्क 1.5 कोटी रुपये अरबी समुद्रात फेकून दिले होते आणि ते सुद्धा सलमानसमोर. नेमकं काय घडलं होतं त्यावेळे पाहूयात..
बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध जगरी दोस्तांमध्ये सलमान खान आणि संजय दत्त या दोघांचं नाव आवर्जून घेतलं जातं. 90 च्या दशकांमध्ये या दोघांची ऑन आणि ऑफ स्क्रीन मैत्री मनोरंजनसृष्टीमध्ये चांगलीच चर्चेत होती.
भाई आणि बाबा या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या सलमान आणि संजूचे सेटवरचे अनेक किस्से आजही आवर्जून सांगितले जातात. हे दोघे कायमच एकमेकांचे पाठीराखे राहिले आहेत. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोघेही कायद्याच्या कचाट्यात सापडले तेव्हा त्यांनी एकमेकांना पाठिंबा दिल्याचं पहायला मिळालं होतं. यामधून त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली.
खरं तर 'साजन' चित्रपटाच्या सेटवर सलमान आणि संजूच्या दोघांच्या मैत्रीला सुरुवात झाली आणि त्या मैत्रीला दिवसोंदिवस बहार येत गेला. मात्र एकदा या दोघांमध्ये एवढं कडाक्याचं भांडणं झालं होतं की संजय दत्तने सलमान खानचे दीड कोटी रुपये चक्क समुद्रात फेकून दिले होते.
हा सारा प्रकार घडला तो सलमानचा धाकटा भाऊ सोहेल खानच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्याच चित्रपटावरुन. या चित्रपटाचं नाव होतं, 'मैने दिल तुझको दिया!' या चित्रपटामध्ये काम करण्यासंदर्भात सोहेलने संजय दत्तकडे विचारपूस केली.
जिवलग मित्राच्या भावाचा म्हणजेच सलमानच्या भावाचा चित्रपट असल्याने संजय दत्तने फार विचार न करता होकार दिला. मात्र चित्रपटाचं शुटींग पूर्ण झाल्यानंतर संजय दत्त एका विषयावरुन संपूर्ण खान कुटुंबावर संतापला.
सलमाननेच 'इंडिया टीव्ही'शी बोलताना एका मुलाखतीदरम्यान संजय दत्तचा हा किस्सा सांगितला होता. त्या दिवशी गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये नवीन बीएमडब्यू दाखल झाली होती. त्याच दिवशी सलमान खानच्या कुटुंबाने संजय दत्तला घरी भेटण्यासाठी बोलावलं होतं.
संजय दत्त खान कुटुंबाच्या भेटीगाठीनंतर घरी जाण्यासाठी निघाला असता सलमानने त्याच्या हातात नव्याकोऱ्या बीएमडब्यूची चावी टेकवली. ही कार तुला गिफ्ट म्हणून ठेव असं सलमान म्हणाला. त्यावेळेस तशी एकमेव कार भारतात उपलब्ध होती, असं सलमानने हा किस्सा सांगताना आवर्जून सांगितलं.
संजय दत्तने नम्रपणे सलमानने दिलेली कारची चावी स्वीकारली. तो सलमानला थँक्यू देखील म्हणाला. मात्र त्यानंतर त्याने जे काही केलं ते पाहून खान कुटुंबाला धक्काच बसला. संजय दत्तने त्या महागड्या आलीशान कारची चावी रागाने चक्क अरबी समुद्रात फेकली.
संजय दत्तला राग येण्याचं कारण म्हणजे त्याने सोहेलच्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी मैत्रीमुळे होकार दिला. मात्र त्याने त्यासाठी मानधन घेतलं नव्हतं. त्याला दीड कोटींचं मानधन देऊ केलं होतं. संजय दत्तने तो चेक नाकारला होता. मात्र सलमानने त्याची भरपाई म्हणून ही कार दिल्याचं संजयच्या लगेच लक्षात आलं आणि त्याने ती कारची चावी रागाने समुद्रात फेकली.
सलमानने हा किस्सा सांगताना, संजूने कारची चावी समुद्रात फेकल्यानंतर ती शोधण्यासाठी काहीजणांना आपण कामाला लावल्याचं सांगितलं. ही भारतामधील अशी एकमेव कार होती. त्या कारची अतिरिक्त चावी सलमानकडे नव्हती. त्यामुळेच तब्बल 4 दिवस माणसांनी शोधाशोध केल्यानंतर बऱ्याच प्रयत्नानंतर ही चावी सापडली होती.
अर्थात ही कार नंतरही संजय दत्तने स्वीकारली नाही. तो या प्रकरणामुळे सलमान आणि सोहेलवर फारच संतापला होता. मात्र नंतर त्याचा राग निवळला. पण सलमान आजही दोघांच्या मैत्रीबद्दल बोलताना हा किस्सा आवर्जून सांगतो जेव्हा संजय दत्तने सलमानच्या कष्टाच्या कमाईतून घेतलेल्या दीड कोटी रुपयांच्या कारची चावी समुद्रात फेकलेली.