अगदीच नाही, तर परिकथांमध्येसुद्धा एखादी राजकुमारी, एक राजकुमार, राजा, राणी.....
सध्या अशीच एक राजकुमारी आणि त्या राजकुमारी प्रेमकहाणी चर्चेचा विषय ठरत असून, ही राजकुमारी सातासमुद्रापारची असली तरीही ती ज्याच्या प्रेमात पडलीये तो मात्र भारतीय वंशाचा असल्या कारणानं इथं या प्रेमकहाणीची जरा जास्तच चर्चा सुरू आहे.
जवळपास 8 वर्षांच्या नात्यानंतर हे प्रेमी युगुल लग्नबंधनात अडकलं. बरं, हळदीच्या पाच वर्षांनंतर ही जोडी म्हणजेच ग्रीसची राजकुमारी थिओडोरा आणि मॅथ्यू कुमार विवाहबंधनात अडकले. 2018 मध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता. यानंतर वर्षभरातच ही जोडी देहरादूनला आली आणि तिथं त्यांचा हळदी समारंभ पार पडला.
2020 मध्येच त्यांना लग्न करायचं होतं. मात्र कोरोनाच्या संकटामुळं तेव्हाचा मुहूर्त टळला आणि अखेर 2024 च्या डिसेंबर महिन्यात या जोडीनं वैवाहिक आयुष्याची सुरुवात केली.
दिवंगत राजा कॉन्स्टेंटाइन आणि राणी अॅनी मेरी यांची मुलगी, 41 वर्षीय थिओडोरानं एथेन्समध्ये लग्न केलं. तिचे वडील राजा कॉन्स्टेंटाइन हे ग्रीसचे शेवटचे राजा होते. इंग्लंडचे राजा चार्ल्स यांचे ते खूप चांगले मित्र आणि प्रिन्स विलियम यांचे गॉडफादर म्हणवले जात होते.
1973 पासून ग्रीसमध्ये राजेशाही संपुष्टात आली असली तरीही थिओडोरा आणि तिच्या कुटुंबानं शाही थाटातच या विवाहसोहळ्याचं आयोजन केलं होतं. राजकुमारी थिओडोराचा जन्म ब्रिटनचा आणि पुढे उच्च शिक्षणासाठी तिनं अमेरिकेची वाट धरली.
2016 मध्ये तिची आणि मॅथ्यू कुमारची भेट झाली. 2018 मध्ये या जोडीनं त्यांच्या नात्याची अधिकृत घोषणा करत साखरपुडा उरकला. मॅथ्यू कुमार हा मुळचा कॅलिफोर्नियातील रहिवासी असून तो एक वकिल आहे.
1990 मध्ये शैलेंद्र 'सॅम' कुमार आणि योलांडा शेरी रिचर्ड्स या जोडीच्या नात्यात मॅथ्यूचा जन्म धाला. शैलेंद्र मुळचे भारतीय वंशाचे असल्यानं त्यांचा मुलगासुद्धा भारताशीच जोडला गेला. मॅथ्यू अमेरिकेत लहानाचा मोठा झाला. मात्र त्याच्या कुटुंबाची पाळंमुळं भारतात असल्यामुळं त्यानं भारतातच हळदी समारंभाचं आयोजन केलं होतं.
मॅथ्यू आणि थिओडोरा 2020 मध्येच विवाहबंधनात अडकणार होते. पण, कोरोनामुळं तेव्हा लग्न टळलं आणि पुढे 2023 मध्ये या जोडीनं लग्नाची तयारी केली. 2023 मध्ये कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तीच्या निधनानं लग्न लांबणीवर पडलं आणि अखेर ही जोडी 2024 मध्ये विवाहबंधनात अडकली. एथेंस मेट्रोपॉलिटन कॅथेड्रलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला.