हिंदी कलाजगतामध्ये तिची एंट्री झाली आणि अनेकांनीच तिच्या रुपाची तुलना माधुरी दीक्षितशी केली. कोण आहे ही अभिनेत्री?
साधारण 90 च्या दशकामध्ये एका अशा अभिनेत्रीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं, जिच्या रुपानं अनेकांना हैराण केलं. अगदी हुबेहूब माधुरी दीक्षितसारख्या दिसणाऱ्या या अभिनेत्रीनं काही लोकप्रिय चित्रपटांमध्ये कामही केलं, पण प्रेमाच्या नात्यापोटी याच अभिनेत्रीनं कारकिर्दीला पूर्णविराम दिला.
ही अभिनेत्री म्हणजे, 1992 मध्ये 'जान तेरे नाम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणारी अभिनेत्री फरहीन खान. तिच्या रुपावर भाळणारे अनेकजण होते. अनेकांनी तर तिला माधुरीची जुळी बहीण म्हणण्यास सुरुवातही केली होती.
90 च्या दशकात फरहीन कलाजगतामध्ये एक लोकप्रिय नाव ठरली होती. पण, प्रत्यक्षात मात्र ती तिच्या कामापेक्षा जास्त खासगी आयुष्यामुळेच चर्चेत राहिली. क्रिकेटरच्या प्रेमात पडलेल्या फरहीननं कलाविश्वातूनही काढता पाय घेतला.
माधुरीच्या रुपाशी बराच मिळताजुळता चेहरा असणाऱ्या फरहीनला बरीच प्रेक्षकपसंती मिळाली होती. करिअरमध्ये अगदी प्रसिद्धीच्या दिवसांतच फरहीननं मनोज प्रभाकर या क्रिकेटपटूशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
लग्नानंतर फरहीननं चित्रपट जगताशी नातं तोडून व्यवसायात नशीब आजमावलं. सध्या ती ऑरगॅनिक स्किनकेअर क्षेत्रात स्वत:ची कंपनी सांभाळत असून, नैनीतालमध्ये एक होमस्टेसुद्धा सांभाळते.
मागच्याच वर्षी एका मुलाखतीदरम्यान तिनं आपल्या जीवनातील चढ- उतारांसह बॉलिवूडमधील कारकिर्द आणि लग्नाविषयी मोकळेपणानं संवाद साधला होता. यावेळी आपल्या कुटुंबातील कोणाचंही कलाजगताशी नातं नसून, रीना रॉय आणि बरखा रॉय या आईच्या मैत्रिणी असल्याचं तिनं सांगितलं होतं.
फरहीनची आई हिंदू आणि वडील मुस्लिम होते. पण, तिला मुस्लिम धर्मातील कट्टरतावाद पसंत नव्हता. याचविषयी एका मुलाखतीत ती म्हणालेली, 'मला लहानपणापासून कायम वाटायचं की मला एका हिंदू मुलासोबतच लग्न करायचंय. मला मुस्लीम धर्मातील कट्टरतावाद पसंत नाही, मी मनोज प्रभाकर यांची दुसरी पत्नी आहे.'