तुम्ही पक्ष्यांचा थवा कधी उडताना पाहिलंय का? तर एका गोष्टीचे तुम्ही निरीक्षण केले असेलच. पक्ष्यांचा थवा नेहमी इंग्रजी अक्षर व्ही या आकारातच उडतो. त्याचे कारण तुम्हाला माहितीये का?
जगभरात पक्ष्यांचे 9000हून अधिक प्रजाती आहेत. त्यातील 1000 हून अधिक प्रजाती फक्त भारतात अस्तित्वात आहेत. पक्षी हे नेहमी समुहातच राहतात.
तुम्ही पक्ष्यांना आकाशात उडताना पाहिलं असेलच. तेव्हा पक्षांचा थवा नेहमी V आकारातच का उडतो हे तुम्हाला माहितीये का? आज हे जाणून घेऊयात.
पक्षी V आकारात उडण्याची अनेक कारणे सांगितली जातात. अनेक संशोधनानुसार यामुळं पक्षांना या आकारात उडणे सोप्पे जाते. तसंच, यामुळं एकमेकांना धडक बसत नाही. तसंच, सगळ्यात पुढे असलेला पक्षी सर्वांचा प्रमुख असतो.
लंडन कॉलेजच्या वेटरनरी कॉलेजचे प्रोफेसर जेम्स उशरवुड यांच्यामते पक्षी V आकारात उडल्यामुळं त्यांना हवेतून जाणे सोपे होते. शिवाय, त्यामुळे इतर पक्ष्यांना उडणेही सोपे होते. जेव्हा पक्षी उडायला शिकतात तेव्हा ते ही सवय अंगीकारतात.
काही पक्षीतज्ज्ञांचा असा दावा आहे की, जेव्हा समुहात पुढे असणारा पक्षी थकतो तेव्हा लगेचच मागचा पक्षी त्याची जागा घेतो आणि समुहाचे नेतृत्व करण्यासाठी पुढे येतो. त्यामुळं सर्व पक्ष एकत्र उडतात.
पक्षांमध्ये सर्वात आधी किंवा सर्वात वेगाने उडण्याची कोणतीही स्पर्धा नाही. सर्व पक्ष्यांना समान हक्क आहे. जो पक्षी आधी उडायला लागतो तो आघाडीवर असतो आणि बाकीचे पक्षी त्याच्या मागे उडायला लागतात.
जेम्स अशरवुडच्या मते, V आकारात पक्ष्यांना उडणे सोप्पे जाते. त्यामुळं समुहातील इतर पक्ष्यांचे पंख एकमेकांवर आदळत नाहीत. त्यामुळं त्यांची उर्जा टिकून राहतेय तसंच ते हवेचा दाबही नियंत्रणात ठेवू शकतात.