Akshaya Tritiya 2024 Date : शास्त्रात अक्षय्य तृतीयेला स्वयंसिद्ध मुहूर्त मानलं जातं. यादिवशी खरेदीसाठी अतिशय शुभ असतं. पण तुम्हाला माहिती आहे का अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते?
यावर्षी अक्षय्य तृतीया ही वैशाख महिन्यीतल शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरी करण्यात येते. पंचांगानुसार ही तिथी 10 मे 2024 असल्याने यादिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे.
धार्मिक ग्रंथानुसार अक्षय्य तृतीयेला भगवान परशुराम, श्री हरी विष्णूच्या अवताराचा जन्म झाल्याचा उल्लेख आहे. जमदग्नी आणि माता रेणुका यांच्या घरी ते पृथ्वीवर जन्माला आले. भगवान परशुराम अमर मानले जाते.
आख्यायिकानुसार माता गंगा अक्षय्य तृतीयेला पृथ्वीवर आली होती. राजा भगीरथने हजारो वर्षे कठोर तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी भगवान शंकराच्या कृपेने गंगा पृथ्वीवर प्रगट झाली. या दिवशी पवित्र आणि शुद्ध गंगेत स्नान केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो असा विश्वास आहे.
भगवान विष्णूचे अवतार महर्षी वेदव्यास यांनी महाभारत लिहायला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सुरुवात केली होती. महाभारताला पाचव्या वेदाची संज्ञा दिली गेली असून यात भगवद्गीतेचाही समावेश आहे. म्हणूनच या दिवशी गीतेच्या 18 व्या अध्यायाचे पठण करण्यात येतं.
अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी पांडवांचे ज्येष्ठ बंधू युधिष्ठिर यांना अक्षयपत्र प्राप्त झालं होतं अशी अख्यायिका आहे. या दिवसापासून शेतकरी रब्बी पिकानंतर रिकामे पडलेले शेत नांगरण्यास सुरुवात करतात.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी अन्नपूर्णेचा जन्म दिवस मानला गेला आहे. देवी अन्नपूर्णेची पूजा केल्याने जेवणाची चव अनेक पटींनी वाढते आणि घरात कधीही धान्याची कमरता भासत नाही अशा मान्यता आहे. या दिवशी गरिबांना अन्नदान करावे असं म्हणतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)