Computer Keyboard Facts: किबोर्डवरील बटणं ही A, B, C, D... अशी योग्य क्रमाने का नसतात असा कधी तुम्ही विचार केला आहे का? तुम्ही विचार तर नक्कीच केला असेल पण तुम्हाला याचं उत्तर ठाऊक आहे का? जगातील जवळजवळ सर्वच किबोर्ड हे QWERTY फॉरमॅटमध्ये का सेट करण्यात आले आहेत तुम्हाला ठाऊक आहे का? यामागे एक खास कारण आहे त्याबद्दलच जाणून घेऊयात...
कंप्युटर असो किंवा लॅपटॉप असो काहीही लिहायचं असेल तर किबोर्डचा वापर करावाच लागतो. साधं लॉगइन करण्यासाठीही किबोर्डचा वापर करावाच लागतो. जे लोक रोज कंप्युटरवर काम करतात त्यांना किबोर्डवर कोणती बटणं कुठे आहेत हे सहज समजतं.
जे किबोर्ड किंवा कंप्युटर अथवा लॅपटॉप फारसा वापरत नाहीत त्यांनाही हे ठाऊक आहे की किबोर्डवरील बटणं ही अक्षरांच्या नैसर्गिक क्रमानुसार नसतात. म्हणजे सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास किबोर्डवरील बटणं ही A, B, C, D... अशी क्रमवारीमध्ये नसतात. मात्र हे असं का असतं तुम्हाला ठाऊक आहे का?
किबोर्डवरील बटणं ही अल्फाबेटिक ऑर्डरमध्ये नसल्याचं मुख्य कारण किबोर्ड डिझाइन करण्याची पद्धत हे आहे. आज आपण जे किबोर्ड वापरतो ते QWERTY फॉरमॅटमधील आहेत.
QWERTY रचनेनुसार असलेल्या किबोर्डवरील बटणांची रचना ही QWERTY म्हणजेच तुम्ही या बोर्डवर अक्षरांची वरील ओळ पाहिली तर त्यात पहिली 6 बटणं ही Q, W, E, R, T, Y अशा क्रमाने आहेत. म्हणून याला QWERTY फॉरमॅट म्हणतात. हा फॉरमॅट 1870 मध्ये तयार करण्यात आला.
QWERTY पद्धतीची रचना ही टाइपरायटर्सची रचना लक्षात घेऊन मूळ टाइपरायटरसाठी तयार करण्यात आलेली अक्षर रचना आहे. टाइपरायटरची बटणं अडकून नये या हेतूने QWERTY फॉरमॅट तयार करण्यात आला.
QWERTY फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी अक्षरं ही एकमेकांपासून दूर असतील याची काळजी घेण्यात आली. म्हणजेच टायपिंग करताना एकाच वेळी ही बटणं टाइपरायटरवर खाली जाणार नाहीत यासाठी ही रचना करण्यात आली. अनेकदा टाइपरायटरवर बटणं खाली गेल्यानंतर अडकून रहायची.
टाइपरायटरवर टाइप करताना बटणं खाली जाऊन त्यावरील छापा हा समोरच्या कागदावर पडायचा आणि अक्षर उमटायचं. अनेकदा ही बटणं खाली गेल्यावर काही तांत्रिक कारणामुळे अडकून पडायची आणि टायपरायटरला पुन्हा सेट करताना वेळ लागायचा.
जेव्हा कंप्युटरसाठी किबोर्ड तयार करण्यात आला तेव्हा QWERTY फॉरमॅटच कायम ठेवण्यात आला. कारण सुरुवातील जे टाइपरायटर वापरायचे तेच लोक पहिले किबोर्ड युझर्स होते. या लोकांना टाइपरायटरची सवय असल्याने त्यावरील रचना जशीच्या तशी किबोर्डसाठी कॉपी करण्यात आली.
तसेच कंप्युटरवरील किबोर्डवर टाइपरायटरवरील बटणांपेक्षा अधिक बटणं असतात. यामध्ये फंक्शन किज, अॅरो किज आणि नंबर किजचा समावेश असतो.
किबोर्डची रचना अशी करण्यात आली की लोकांना सर्व बटणांचा वापर सहज करता यावा. QWERTY पद्धत हा किबोर्ड रचनेचा एकमेव फॉरमॅट नाही. इतरही अनेक किबोर्ड फॉरमॅट अस्तित्वात आहे. मागील काही वर्षांमध्ये Dvorak Simplified किबोर्ड आणि Colemak किबोर्डही चर्चेत आहे.
QWERTY किबोर्डपेक्षा Dvorak Simplified किबोर्ड आणि Colemak किबोर्ड अधिक सोपा असल्याचा दावा केला जातो. मात्र हे किबोर्ड मोठ्या प्रमाणात वापरले जात नाहीत. जगभरातील जवळजवळ सर्वच कंप्युटर QWERTY किबोर्ड वापरतात.
QWERTY किबोर्ड फॉरमॅटमध्ये टाइपराइटरवरील बटणं अडकून पडू नयेत या दृष्टीने तयार करण्यात आला आहे. शब्द लिहिताना अक्षरांची बटणं दाबताना एकाच वेळी सर्वाधिक वापरली जाणारी बटणं अडकून पडू नये या हेतूने तयार केलेल्या टाइपरायटर फॉरमॅटमधून हा किबोर्ड थेट उचलला असल्याने आजही तोच फॉरमॅट वापरला जातो.