Who Is Rachin Ravindra: भारतीय वंशाचा एक खेळाडू पाकिस्तानविरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या सामन्यात न्यूझीलंडच्या विजयामध्ये चमकला आहे. वर्ल्डकप 2023 च्या पहिल्याच सराव सामन्यात पाकिस्तानच्या सो कॉल्ड जगात भारी गोलंदाजांची लाज काढत न्यूझीलंडने हा 44 व्या ओव्हरमध्येच 345 धावांचं लक्ष्य गाठलं. या तुफान खेळीचा पाया एका भारतीय खेळाडूने रचला आहे. हा खेळाडू त्याच्या नावामुळे चर्चेत आहे. जाणून घेऊयात त्याच्या या आगळ्या वेगळ्याचं नावंच भारताशी काय कनेक्शन आहे ते...
पाकिस्तान भारताच्या भूमीवर वर्ल्डकप 2023 साठी पहिल्यांदा मैदानात उतरल्यानंतर या भारतीय वंशाच्या खेळाडूने पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. हा 24 वर्षीय तरुण कोण आहे पाहूयात...
एकदिवसीय वर्ल्डकपआधी खेळवल्या जात असलेल्या सराव सामन्यांपैकी पहिल्या सराव सामन्यात केन विलियम्सनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवला आहे. हैदाराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानात पार पडलेल्या सराव सामन्यात पाकिस्तानच्या संघाला न्यूझीलंडच्या संघाने पराभूत केलं. 345 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने हा 44 व्या ओव्हरमध्येच जिंकला. न्यूझीलंडने सामना 5 गडी राखून जिंकला.
न्यूझीलंडच्या 4 फलंदाजांनी अर्धशतकं झळकावली. विशेष म्हणजे जगातील सर्वोत्तम गोलंदाजी करणारा संघ अशी ओळख असलेल्या पाकिस्तानच्या गोलंदाजांना 345 धावांचं लक्ष्याचा बचावही करता आला नाही. न्यूझीलंडने 38 चेंडू शिल्लक असतानाच स्कोअरबोर्डवर 346 धावा झळकावत सामना जिंकला.
न्यूझीलंडच्या या विजयामध्ये एका भारतीय वंशाच्या फलंदाजाने मोलाचं योगदान दिलं. या खेळाडूचं शतक अवघ्या 3 धावांनी हुकलं. विशेष म्हणजे या खेळाडूचं कनेक्शन सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडशी आहे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल. पण हे खरं आहे.
खरं तर भारतीय वंशाच्या खेळाडूंनी न्यूझीलंडकडून खेळणं काही नवीन नाही. ईश सोढी, जीतन पटेल, जीत रावल यासारखे भारतीय वंशाचे खेळाडू न्यूझीलंडकडून खेळले आहेत. या यादीमधील सर्वात लेटेस्ट नाव म्हणजे रचिन रवींद्र!
रचिन रवींद्रने नोव्हेंबर 2021 मध्ये भारत दौऱ्यामध्ये कानपूर कसोटीतून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 29 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या पाकिस्तान विरुद्धच्या वर्ल्डकप आधीच्या सराव सामन्यामध्ये रचिन रवींद्रने न्यूझीलंडला उत्तम सुरुवात करुन देताना 72 चेंडूंमध्ये 97 धावा केल्या. यामध्ये 16 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
रचिनचा जन्म वेलिंग्टनमध्ये भारतीय वंशाचे रवि कृष्णमूर्ती आणि दीपा कृष्णमूर्ती यांच्या पोटी झाला. रवि हे एक सॉफ्टवेअर सिस्टीम आर्किटेक्ट आहेत.
रचिनचे वडील रवि 1990 च्या दशकामध्ये बंगळुरुमधून न्यूझीलंडला स्थायिक झाले. ते तेथील हट हॉक्स क्लबचे संस्थापक आहेत. रवि हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत. ते बंगळुरुमध्ये फार वर्ष क्रिकेट खेळले.
रचिन रविंद्रचं नाव ऐकून तो भारतीय असल्याचं समजतं. पण रचिन हे नाव का ठेवण्यात आलं. तर यामागे कारण आहे भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड.
राहुल द्रविडच्या (Rahul Dravid) नावातील पहिलं अक्षर रा (Ra) आणि सचिन तेंडुलकरच्या नावातील 'चिन' (Chin) नाव एकत्र करुन रचिन (Rachin) हे नाव ठेवण्यात आलं आहे.
1999 साली जन्मलेला रचिन 2016 च्या अंडर 19 विश्वचषकाबरोबरच 2018 च्या अंडर 19 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंडच्या संघातून खेळला आहे.
रचिनने नोव्हेंबर 2016 मध्ये एका मुलाखतीत, "भारताचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर माझा आदर्श आहे. त्याच्याप्रमाणे फलंदाजीची शैली शिकण्याचा मी प्रयत्न केला आहे. सचिनची फलंदाजी मी लहान असल्यापासून पाहिली आहे," असं म्हणाला होता.
रचिन हा अष्टपैलू खेळाडू असून तो 3 कसोटी सामने खेळला आहे. त्यात त्याने तळाला खेळताना 73 धावा केल्या आहेत आणि एकूण 3 विकेट्स घेतल्या आहेत.
12 एकदिवसीय सामन्यांमध्ये रचिनने 8 डावांमध्ये 189 धावा केल्या असून यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 12 विकेट्स घेतल्या आहेत. 60 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
टी-20 मध्ये रचिनने 18 सामने खेळले असून एकूण 11 विकेट्स घेतल्यात. 22 वर 3 हा त्याचा बेस्ट बॉलिंग फिगर असून फलंदाजी करताना त्याने 145 धावा केल्या आहेत.
सराव सामन्यातच भन्नाट फलंदाजी करत रचिनने विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. आता संपूर्ण वर्ल्डकपमध्ये कसा खेळतो हे पहाणं महत्त्वाचं आहे.