Spiti Valley Trip : तुमचंच उदाहरण घ्या, समोरून पोस्टमनकाका दिसले तर ते नेमके कुठे जात आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण नकळतच स्वत:ला प्रश्न विचारतो. हेच ते कुतूहल.
पत्रव्यवहार म्हणजे एकेकाळी माहितीच्या देवाणघेवाणीचंही प्रमुख साधन होता. पण, काळ पुढं गेला तंत्रज्ञान प्रगत झालं आणि पोस्टाचं हे माध्यम आठवणींच्या खोलीत कुठेतरी हरवलं.
हाच पत्रव्यवहार लुप्त होण्याच्या मार्गावर असला तरीही तो एका खास आणि तितक्याच रंजक कारणामुळं चर्चेत आहे. किंबहुना जगात एक असं ठिकाण आहे, जिथून प्रत्येकजण आपल्या माणसांना पत्र पाठवण्यासाठी धडपड करत असतो. (Spiti Valley Trip) हे ठिकाण तुमच्यापासून फार जवळ आहे, कारण ते भारतातच आहे. झालात ना आश्चर्यचकित? हिमाचल प्रदेशातील हिक्कीम या गावात जगातील सर्वाधिक उंचीवर असणारं पोस्ट ऑफिस सक्रिय आहे.
आजही या पोस्टातून असंख्य पत्र पाठवली जातात. हिमाचल आणि त्यातही स्पितीचं खोरं पाहण्यासाठी येणारा प्रत्येकजण हिक्कीम गावाला आवर्जून भेट देतो. इथं येऊन पोस्टकार्डावर मनातल्या भावना लिहून ते मनाजोग्या ठिकाणी पाठवतो.
देशोदेशीचे पर्यटक जेव्हाजेव्हा हिक्कीमला येतात तेव्हातेव्हा त्यांना इथं बरीच नवी माहिती मिळते. एका क्षणात एखादा मेसेज जगाच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्याच पोहोचवता येत असला तरीही महिन्याभराच्या विलंबानंतर दारावर येणारं हे पत्र मात्र प्रचंड खास असतं.
समुद्रसपाटीपासून 14567 फूट उंचीवर असणाऱ्या या पोस्टानं सध्या संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं आहे. काही वर्षांपूर्वी हे पोस्ट ऑफिस रस्त्याच्या खालच्या बाजुला होतं.
गेल्या काही महिन्यांमध्ये त्याचं नवं रुप सर्वांसमरो आलं जिथं एक भलामोठा पोस्टाचा डबाच उभा करण्यात आला. ज्यामुळं या ठिकाणच्या सौंदर्यात नव्यानं भर पडली.
साधारण 1983 पासून या पोस्टातून जगाच्या कानाकोपऱ्याच पत्र पाठवली जात आहेत. मग, तुम्ही कधी जाताय हिक्कीमला?