Yuzvendra Chahal On Faking Marriage: 2020 मध्ये विवाह झाल्यानंतर 2025 च्या सुरुवातीला हे दोघे अचानक विभक्त झाले. मात्र हा निर्णय अचानक घेण्यात आलेले नव्हता. शेवटच्या दोन वर्षात काय घडलं आणि दोघे दूर का गेले हे चहलने सांगितलंय. तो काय म्हणालाय पाहूयात...
धनश्रीसोबतच्या संसरात नेमकी चूक कुठे झाली याबद्दल युजवेंद्र चहलने पहिल्यांदाच भाष्य केलंय. त्याने फेक मॅरेजमध्ये होतो असंही म्हटलंय. पण या फेक मॅरेजचा अर्थ काय? नक्की या दोघांमध्ये घडलं काय ते चहलने सविस्तरपणे सांगितलंय. पाहूयात चहलने नक्की काय म्हटलंय...
भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) पूर्वीश्रमीची पत्नी धनश्री वर्मासोबत (Dhanashree Verma) घटस्फोटाबाबत पहिल्यांदाच मोठा गौप्यस्फोट केला आहे. दोघांचा संसार कसा मोडला याबद्दल चहल मनमोकळेपणे बोलला आहे.
चहल आणि धनश्रीने 2020 मध्ये लग्न केले होते, परंतु लग्नाच्या तिसऱ्या वर्षापासून त्यांच्या नात्यात मिठाचा खडा पडला असं सांगितलं जात होतं. मात्र आता याला स्वत: चहलने दुजोरा दिलाय.
यूट्यूबर राज शमानीशी बोलताना, 35 वर्षीय चहलने तो आणि धनश्री वैवाहिक जीवनामधील 3 वर्ष एकत्र राहिले आणि नंतर संसार सुखाचा सुरु असल्याचं नाटक करत होते असं म्हटलं आहे. आम्ही फेक मॅरेजमध्ये होतो, असं चहल म्हणाला आहे. दोघे एकमेकांपासून का दुरावले याबद्दलही चहल बोललाय.
आमच्यात काहीही मतभेद नाही असं जेव्हा तू सांगत होता त्यावेळी तू खोटे बोलत होता का याबद्दल विचारले असता, चहलने होकारार्थी मान हलवत उत्तर दिलं.
चहलने तो आणि धनश्री दोघेही त्यांच्या कारकिर्दीवर खूप लक्ष केंद्रित करत होते, असंही स्पष्ट केलं. त्यामुळेच दोघांनाही नात्याला प्राधान्य देणे कठीण झाल्याचंही त्याने मान्य केलं.
नात्याला प्राधान्य देणं कठीण झालं म्हणूनच, काळाबरोबर आमच्यातील भावनिक दुरावा वाढत गेला, असं सांगताना चहलने दोघांनाही याची जाणीव होती असं स्पष्टपणे मुलाखतीत सांगितलं.
नात्यांमध्ये तडजोड करावी लागते, परंतु कधीकधी दोन लोकांचे व्यक्तिमत्त्व किंवा महत्त्वाकांक्षा जुळत नाहीत, असं सूचक विधान धनश्रीपासून वेगळं होण्यासंदर्भात बोलताना चहलने केलं.
"नाते हे तडजोडीसारखे असते. जर एकाला राग आला तर दुसऱ्याला ऐकावे लागते. कधीकधी दोन लोकांचे स्वभाव जुळत नाही. मी भारतासाठी खेळत होतो, तीही तिला आवडेल ते करत होती. हे एक दोन वर्षे चालू होते," असं चहल म्हणाला.
"त्यावेळी, मी त्यात इतका गुंतलो होतो की मला तिथे वेळ द्यावा लागला. मी त्यावेळी नात्याबद्दल विचार करू शकलो नाही. मग हे असं दररोज होत राहिल्यासारखं झालं. नंतर नंतर तर केवळ तुम्ही विचार करा आणि सोडून द्या असा प्रकार होत होता," अशी कबुली चहलने दिली.
"दोन महत्त्वाकांक्षी लोक एकत्र राहू शकत नाहीत. प्रत्येकाचे स्वतःचे जीवन असते. प्रत्येकाची स्वतःची ध्येये असतात. जोडीदार म्हणून, तुम्हाला त्याचे समर्थन करावे लागेल. "तुम्ही 18-20 वर्षांपासून एखाद्या गोष्टीसाठी काम करत आहात, नात्यासाठी तुम्ही ते सोडून देऊ शकत नाही," असंही चहल पुढे म्हणाला. यामधून त्याने करिअरला नात्यापेक्षा अधिक प्राधान्य दिल्याचं अधोरेखित होतं.
चहलने खुलासा केला की दोघांनीही पूर्णपणे विभक्त होईपर्यंत आणि विभक्त होण्याची प्रक्रिया अंतिम होईपर्यंत दोघांनाही सर्व काही अगदी खाजगी ठेवण्याचा निर्णय घेतला होता. याच कालावधीला चहलने फेक मॅरेजमध्ये होतं असं म्हटलं आहे. म्हणजेच दोघेही लग्नाच्या तीन वर्षानंतर लग्न अन् संसार सुरळीत सुरु आहे असा जगासमोर बनाव करत होते, अशी कबुली चहलनेच दिली आहे.
"हे (आमच्यातील घटस्फोटासंदर्भातील प्रक्रिया आणि वाद) बऱ्याच दिवसांपासून चालू होते. आम्ही सारं काही लोकांना दाखवायचे नाही असं ठरवलं होतं. आम्ही सर्वजनिकरित्या काहीही बोलणार नाही. आम्ही सोशल मीडियावर सामान्य जोडप्यासारखे राहू," असं ठरवलेलं, अशी माहिती चहलने दिली. (सर्व फोटो सोशल मीडियावरुन साभार)