Rs 22526 crore Owner Mobile Always On Silent Mode: त्याने त्याच्या भावाबरोबर एक कंपनी स्थापन केली. आज ही कंपनी भारतामधील सर्वाधिक नफा कमवणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. भारतातील सर्वोत्तम आणि सर्वात यशस्वी स्टार्टअपमध्ये या कंपनीचा समावेश होतो. मात्र एवढं यश मिळवणारी व्यक्ती तिचा फोन कायम सायलेंटवर का ठेवते तुम्हाला ठाऊक आहे का? या व्यक्तीनेच यासंदर्भात खुलासा केला आहे. त्याबद्दलच जाणून घेऊयात...
झिरोदा कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन कामत यांनी स्वत: संदर्भात एक रंजक खुलासा केला आहे.
वयाच्या 17 व्या वर्षी कॉल सेंटरमध्ये काम करण्यापासून करिअरची सुरुवात करत आज तब्बल 22 हजार 526 कोटींचा मालक असलेल्या नितीन कामत यांनी स्वत:चे काही जुने फोटो शेअर करत एक रंजक खुलासा केला आहे.
नितीन कामत यांनी आपला फोन कायम सायलेंट मोडवर असतो असं सांगितलं आहे. बरं हा फोन सायलेंटवर का असतो याचं कारणही त्यांनीच सांगितलं आहे.
नितीन कामत यांनी स्वत:चे काही जुन्या सहकाऱ्यांबरोबरच तरुणपणीचे फोटो शेअर करत आपण चार वर्ष कॉल सेंटरमध्ये काम करत होतो असं म्हटलं आहे.
आपण अमेरिकेतील लोकांना कॉल करायचो. मात्र आता जे मी केलं त्याचाच मला त्रास होत आहे असं चित्र दिसत आहे, असंही नितीन कामत म्हणाले आहेत.
स्वत: कॉल सेंटरमध्ये काम करण्याचा संदर्भ देत याच कारणामुळे आपण आता मोबाईल फोन कायम सायलेंटवर ठेवतो असं नितीन यांनी म्हटलं आहे.
कॉल सेंटरमधून सातत्याने आपल्याला फोन येत असतात त्यामुळे टेलीमार्केटिंगच्या कॉलला वैतागून आपण फोन कायमचा सायलेंटवर ठेवला आहे, असं नितीन कामत म्हणाले.
"माझा फोन वापरण्याजोगा राहिलेला नाही. याचं कारण म्हणजे टेलिमार्केटींग कॉलमुळे मी तो सायलेंटवर ठेवला आहे. जे काही आपण देतो तेच आपल्याला परत मिळतं," अशी कॅप्शन नितीन कामत यांनी या जुन्या फोटोंना दिली आहे.
"मी चार वर्ष कॉल सेंटरमध्ये काम केलं. मी अमेरिकेतील लोकांना कॉल करायचो. मला वाटतं कार्म कायम आपल्याला अद्दल घडवत असतं," असं नितीन यांनी मजेदार कॅप्शन देताना म्हटलं आहे.
करिअरच्या सुरुवातीला आपण कॉल सेंटरमधून कामाचा भाग म्हणून फोन करुन इतरांना त्रास दिला तसाच त्रास आता मला दिला जात असल्याने फोन सायलेंटवर ठेवावा लागत असल्याचं नितीन यांचं म्हणणं आहे.
अनेकांनी यावर रंजक प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. या पोस्टला साडेतीन लाखांच्या आजपास व्हूज मिळालेत.
काही स्टार्टअप कंपन्यांमधील व्यक्तींनी इथे आम्हाला आमचे बिझेनेस प्रपोजल मांडायला तुमचा क्रमांक मिळत नाही आणि टेलीकॉम कंपनीवाले तुम्हाला त्रास देण्यासाठी कॉल करतात, कमाल आहे, अशा अर्थाची मतं नोंदवली आहेत.
झिरोदा ही एक ब्रोकरेज कंपनी आहे. या माध्यमातून युझर्सला ऑनलाइन डिमॅट खाते उघडून शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि इतर गुंतवणूक पर्यायांमध्ये पैसे गुंतवता येतात. झिरोदाने मागील आर्थिक वर्षात 2 हजार कोटी रुपयांचा नफा कमावला आहे.
निखिल आणि नितीन कामत या दोन भावांनी ही कंपनी स्थापन केली आहे. कोणत्याही सर्वसामान्य तरुणाप्रमाणे साहसी खेळांची आवड असलेले्या नितीन कामत यांची एकूण संपत्ती म्हणजेच नेट वर्थ 2023 नोव्हेंबरमधील आकडेवारीनुसार 22,526 कोटी रुपये इतकी आहे.