Marathi News> पुणे
Advertisement

महाराष्ट्रही वायनाडच्या वाटेवर? 10 वर्षांपूर्वी दरड प्रलय पाहिलेल्या गावातून धक्कादायक बातमी

पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच पुण्यातील माळीणमधील पसारवाडी गावातील डोंगराला भेगा पडल्या  आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

महाराष्ट्रही वायनाडच्या वाटेवर? 10 वर्षांपूर्वी दरड प्रलय पाहिलेल्या गावातून धक्कादायक बातमी

Malin Rain : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. आज देखील पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील माळीण परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने तेथील डोंगराला भेगा पडल्याची माहिती समोर आली आहे.  10 वर्षांनंतर पुन्हा एकदा माळीणमधील पसारवाडी गावातील डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच पाऊस देखील प्रचंड पडत आहे. या डोंगराच्या वर पाच ते सहा कुटुंब राहत आहेत. 

हे रहिवाशी पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, ते होत नसल्यानं त्यांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे. अशातच पुणे शहरातील धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. 

2014 मधील माळीणची सकाळ

माळीण हे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील एक आदिवासी भागातील गाव आहे. पुण्यापासून 75 ते 80 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. डिंभे धरणाच्या परिसरात असणाऱ्या या गावाची लोकसंख्या 750 च्या आसपास आहे. 2014 मधील मुसळधार पावसामुळे या गावावर दरड कोसळली होती. या संपूर्ण घटनेत गाव गाडलं गेलं होतं. 30 जुलै 2014 रोजी ही पहाटेच्या वेळी घटना घडली होती. 44 हून अधिक घरं नागरिकांसह या घटनेत गाडली गेली. 

माळीण गावातील या नागरिकांना त्या दिवशीची सकाळ पाहता आली नव्हती. या घटनेत पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी, जनावरे यांच्यासह सर्वच मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. त्यानंतर दिवस-रात्र ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना काढण्याचे प्रयत्न सुरु होते. 

हवामान विभागाकडून पुण्याला रेड अलर्ट

हवामान विभागाकडून आज पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यातील घाट आणि डोंगर भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच राज्यात पुढील 4 दिवस अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

Read More