Marathi News> पुणे
Advertisement

पुणेकरांनो पनीर खाताय? आताच व्हा सावध, गुन्हे शाखेकडून 1400 किलो भेसळयुक्त पनीर जप्त

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 मधील कर्मचाऱ्यांनी 1400 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केलं आहे. 

पुणेकरांनो पनीर खाताय? आताच व्हा सावध, गुन्हे शाखेकडून 1400 किलो भेसळयुक्त पनीर जप्त

Pune News : पुणे जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. अशातच आता पुणे जिल्ह्याच्या मांजरी येथे भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या फँक्टरीवर पुणे पोलिसांच्या युनिटसह गुन्हे शाखा आणि अन्न औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत 11 लाख 56 हजार रुपये किंमतीचे भेसळयुक्त पनीर आणि विविध मुद्देमाल हस्तगत करत कारवाई केली आहे. यावेळी प्रशासनाकडून नागरिकांनी पनीर खरेदी करताना सावधानता बाळगावी असं आवाहन केलं आहे. 

पुणे पोलिसांनी छापेमारीत तब्बल 1400 किलो पनीर जप्त केले आहे. सध्या पोलिसांकडून जप्त करण्यात आलेले पनीरचे नमुने हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 मधील कर्मचाऱ्यांना एका कारखान्यात भेसळयुक्त पनीर तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी भेसळयुक्त पनीर संदर्भातील माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला दिली. ही माहिती मिळताच पोलिस आणि औषध प्रशासन विभागाने या कारखान्यावर छापा टाकत संयुक्त कारवाई केली. या कारवाईमध्ये पनीरच्या कारखान्यातून 400 किलो जी एम एस पावडर, एस एम पी 1800 किलो पावडर, 718 लिटर पामतेल आणि 1400 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत 11 लाख रुपये इतकी आहे. सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. 

चंद्रपुरात दीड लाखांचे 472 किलो बनावट पनीर जप्त

उन्हाळा लागताच लग्न सराईचे वेध लागले असताना चंद्रपुरात अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने दीड लाख रुपयांचे 472 किलो बनावट पनीर जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर शहरातील सपना डेली नीड्स या दुकानातून चीज अनॅलॉग हा अन्नपदार्थ पनीर म्हणून विक्री करत असल्याचे लक्षात आल्यावर धाड टाकून 197 किलो साठा जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत शहरातील मुख्य गोल बाजार परिसरातील न्यू भाग्यश्री घी भंडार या दुकानातून 275 किलो हाच पदार्थ जप्त करण्यात आला.

दोन्ही कारवाईतील नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून त्यानंतर अन्न व सुरक्षा मानके कायदा 2006 अंतर्गत संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे. लग्नसराईचा हंगाम व उन्हाळा बघता पनीरची वाढती मागणी लक्षात घेता हे घोटाळे केले जात आहेत. कारवाईत जप्त केलेले पनीर जमिनीत पूरुन नष्ट करण्यात आले होते. 

Read More