Yugendra Pawar : राज्याच्या सहकार क्षेत्रातील साखर कारखाना म्हणून अग्रगण्य समजला जाणारा पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जाणारा सहकार क्षेत्रातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच लागणार असून ही निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढवण्याचे संकेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी दिली आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी तशी तयारी देखील सुरू केली असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. निवडणुकीसंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सूचनेनुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल असे युगेंद्र पवार यांनी म्हटले असले तरी निवडणूक पवार विरुद्ध पवार होणार असेच चित्र सध्या दिसत आहे.
बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना
माळेगाव कारखान्याचे 19,549 सभासद आहेत. राज्याच्या सहकार क्षेत्रात माळेगाव साखर कारखाना अग्रगण्य समजला जातो. याशिवाय बारामती तालुक्याच्या राजकारणात या कारखान्याला महत्त्वाचे स्थान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना आपली ताकद दाखवण्याची संधी आता कारखान्याच्या निवडणुकीत मिळणार आहे. याच कार्यकर्त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाला मताधिक्य मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले होते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्था निवडणुकीच्या निमित्ताने या कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे
सध्या कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सत्ता असून त्यांच्या विरोधात असलेले यापूर्वीचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सहकारातील तज्ञ माजी अध्यक्ष चंद्रराव तावरे कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे यांच्या हातातून अजित पवार यांनी हा कारखाना घेतला होता. आता भाजप बरोबर अजित पवार असल्याने त्यांच्या गोठात मात्र अद्यापही हालचाली दिसत नसल्या तरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाकडून निवडणूक लढवण्याची संकेत दिल्याने बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त दिसून येणार आहे.