Festival Calendar 2025 : भारतीय संस्कृतीत निसर्ग आणि मानवाचं नातं सातत्याने जपण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतोय. इथल्या धार्मिक, सामाजिक आणि सास्तिक परंपरांमध्ये निसर्गाचं अस्तित्व, खोलवर रूजलेला पाहिला मिळतो. सृष्टीच्या बदलाशी सांगड घालण्यासाठी हिंदू धर्मात विविध सण साजरे करण्यात येतात. श्रावण मास लागताच सणांची चाहुल लागते. चला मग यंदा कोणता सण कोणत्या तारखेला आहे, जाणून घेऊयात.
यंदा आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या 24 जुलैला साजरा करण्यात येणार आहे. याचा अर्थ 25 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होते. महाराष्ट्रात श्रावणात नॉनव्हेज आणि मद्यसेवन करत नाही. त्यामुळे त्यापूर्वी गटारी अमावस्येला नॉनव्हेजची पार्टी रंगते.
हिंदू धर्मात नाग पंचमीला अतिशय महत्त्व आहे. श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला नाग पंचमी साजरी केली जाते. या श्रावणात शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 28 जुलै रोजी रात्री 11:25 वाजेपासून 29 जुलैला दुपारी 12:47 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 29 जुलैला नागपंचमी साजरी करण्यात येणार आहे.
हिंदू धर्मात एकादशीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात दोन एकादशी असतात. एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूला समर्पित असतं. यंदा पुत्रदा एकदाशीचं व्रत 5 ऑगस्टला पाळण्यात येणार आहे.
नारळी पौर्णिमा ही कोळी लोकांसाठी मोठा सण असतो. यादिवशी समुद्रात नारळ अर्पण करुन पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात केली जाते. तर श्रावण महिन्यातील पौर्णिमा तिथीला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येतो. पण यंदा हिंदू पंचांगानुसार श्रावण पौर्णिमा तिथी 8 ऑगस्टला दुपारी 2.12 सुरु होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी 9 ऑगस्ट दुपारी 1.21 पर्यंत पौर्णिमा तिथी असणार आहे. अशात 8 ऑगस्टला नारळी पौर्णिमा साजरी करण्यात येणार आहे. तर 9 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सण आहे.
श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी 15 ऑगस्ट रोजी रात्री 8:19 वाजेपासून 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6:04 वाजेपर्यंत असणार आहे. अशाप्रकारे, जन्माष्टमीचे व्रत 15 ऑगस्ट, शुक्रवार रोजी पाळले जाईल. तर गोपाळकाला म्हणजे दहीहंडीचा सण 16 ऑगस्ट 2025 ला असणार आहे.
बैल पोळा हा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा कृषी सण आहे. हा सण बैलांना समर्पित आहे. यंदा बैल पोळा सण श्रावण अमावस्याला साजरी करण्यात येते. यंदा पिठोरी अमावस्या ही 22 ऑगस्टला सकाळी 11.58 वाजेपासून 23 ऑगस्ट 2025 ला 11.38 वाजेपर्यंत असणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 22 ऑगस्टला बैल पोळा, पिठोरी अमावस्या साजरी करण्यात येणार आहे.
महादेव आणि पार्वतीला समर्पित हा सण भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा करण्यात येतो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथी 25 ऑगस्ट 2025 ला रात्री 12.36 वाजेपासून 26 ऑगस्टला दुपारी 13.56 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार 26 ऑगस्टला हरितालिका तृतीया व्रत साजरं करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत लाडक्या बाप्पा घरोघरी विराजमान असतात. पंचांगानुसार, यावर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट दुपारी 01:54 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 27 ऑगस्टला दुपारी 03:44 वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरी करण्यात येणार आहे.
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 ऑगस्टला ऋषिपंचमी साजरी करण्यात येणार आहे. या सणाला महाराष्ट्रात ऋषीची भाजी करण्यात येते. तर या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, वशिष्ठ, गौतम, जमदग्नी आणि विश्वामित्र या सात ऋषींची पूजा केली जाते.
गणपतीपाठोपाठ तीन दिवस गौराईचं आगमन होतं. यंदा ज्येष्ट गौरी आणि कनिष्ट गौरीचं आगमन 31 ऑगस्ट 2025 ला होणार आहे. तर 1 सप्टेंबर 2025 ला गौराईला नैवेद्य दाखवला जाणार आहे. तर 2 सप्टेंबर 2025 ला गौरी गणपतीचं विसर्जन होणार आहे.
11 दिवस घरोघरी आणि गणेश मंडळात विराजमान असलेल्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवस म्हणजे अनंत चतुर्दशी. यावर्षी अनंत चतुर्दशी 6 सप्टेंबर 2025 ला असणार आहे. त्यानंतर वेध लागतात ते घटस्थापना म्हणजे नवरात्रीचे. यंदा नवरात्रीचा उत्साह 22 सप्टेंबर 2025 ला असणार आहे.