Gudi Padwa 2025 : उभारून आनंदाची गुढी दारी, जीवनात येवो रंगात न्यारी...हिंदूचं नवं वर्ष म्हणजे मराठी लोकांसाठी गुढीपाडवा सण असतो. महाराष्ट्रात मराठी नवं वर्षांचं स्वागत हे घरोघरी गुढी उभारून करण्याच येतो. पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी गुढीपाडवा साजरा करण्यात येतो. यंदा गुढीपाडव्याच्या तारखेबद्दल संभ्रम आहे. गुढीपाडवा 29 की 30 मार्च नेमका कधी साजरा करायचा आहे, शिवाय पूजा विधी आणि महत्त्व जाणून घ्या.
हिंदू पंचांगानुसार, यावर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 29 मार्च रोजी दुपारी 4.27 वाजेपासून रविवार, 30 मार्चला दुपारी 12:49 वाजेपर्यंत असणार आहे. हिंदू धर्मात उदय तिथीनुसार सण साजरी करण्यात येते. अशा परिस्थितीत, उदय तिथीनुसार, यावर्षी गुढीपाडवा रविवार, 30 मार्चला साजरा करण्यात येणार आहे.
ब्रह्म मुहूर्त - 04:41 पहाटे ते 05:27 पहाटे
विजय मुहूर्त - दुपारी 02:30 ते 03:19 पर्यंत
संध्याकाळची वेळ - संध्याकाळी 06:37 ते 07
अभिजीत मुहूर्त - दुपारी 12:01 ते 12:50 पर्यंत
निशिता मुहूर्त- सकाळी 12:02 ते दुपारी 12:48 पर्यंत
गुढीपाडव्याच्या दिवशी इंद्र योग असणार असून हा योग संध्याकाळी 5:54 पर्यंत असणार आहे. या योगात शुभ कार्य केल्याने यश मिळतं असं ज्योतिषशास्त्रात मानलं जातं. तसंच ब्रह्मदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो असा विश्वास आहे. या शुभ मुहूर्तावर सर्वार्थ सिद्धी योगाचाही योगायोग जुळून आलाय. 31 मार्च रोजी दुपारी 04:35 ते 06:12 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे. ज्योतिषशास्त्र सर्वार्थ सिद्धी योगाला शुभ कार्यासाठी सर्वोत्तम मानते. तर गुढीपाडव्याच्या दिवशी पंचकची वेळ सकाळी 06:13 ते दुपारी 04:35 पर्यंत असते. याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी बव, बलव आणि कौलव करण होण्याची शक्यता आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वप्रथम ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करावे. यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करावे. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंब्याच्या पानांची तोरण लावावी. रांगोळी काढावी. त्यानंतर घराच्या काही भागात गुढी उभारावी. गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्माजींची संपूर्ण कुटुंबासह विधीनुसार पूजा करावी. देवी मातेची पूजा करावी. गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची पूजा करावी.
गुढीपाडव्याच्या सणाला निश्चितच धार्मिक महत्त्व आहे. याशिवाय हा सण जीवनातील शुभ आणि समृद्धीचे प्रतीकही मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढी उभारली जाते. ते समृद्धीचे प्रतीक आहे. गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होते. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याला विश्वाची निर्मिती केल्याचे पौराणिक कथेत सांगितले आहे. त्यामुळेच या दिवशी ब्रह्मदेवाच्या पूजेचेही विशेष महत्त्व मानले जाते.
पौराणिक कथेनुसार, ब्रम्हदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केली, असा समज आहे. त्यामुळे हा सण मराठी महिन्याची नवीन वर्षाची सुरुवात म्हणून मानले जाते आणि पंचांगानुसार, हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. प्रभू श्रीरामाने रावणावर पराभव करुन विजय मिळवला आणि अयोध्येत परतले त्याच्या विजयानंतर त्याचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली गेली अशी समजूत आहे.
अजून एक पौराणिक कथेनुसार, गुढीपाडव्याच्या दिवशी सम्राट शालिवाहन याने हूणांचा पराभव करुन आपले राज्य स्थापन करुन शालिवाहन शक सुरु केले. त्यादिवशी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा दिवस होता.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)