Holi 2025 Date : बुरा ना मानो होली है...रंगांचा हा उत्सव श्रीकृष्ण आणि राधाचा प्रेमाचं प्रतिक मानलं जातं. वृंदावन आणि मथुरामध्ये रंगांचा हा उत्साह मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. वृंदावन आणि मथुरामधील होळी पाहण्यासाठी परदेशातूनही पाहुणे येतात. रंगांचा हा उत्सव प्राचीन काळापासून साजरा करण्यात येतो. फाल्गुन पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणतात. या दिवशी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे होलिकोत्सव. यालाच होळी असं म्हणतात. माघ महिना संपतात ऋतुंचा राजा असलेल्या वसंताचे आगमन होतं. धरतीमाता नवनवीन पानाफुलांनी बहरते. अनेक ठिकाणी ग्रामदैवतांच्या यात्रा, उत्सवाला भरती येते. कुस्त्यांचे फड गर्जत असतात. सर्वत्र आनंदी आनंद पसरतो. अशावेळी हा आनंद वाढविण्यासाठी येतो होळीचा सण. उत्तर भारतात यालाच दोलायात्रा, होरी म्हणतात. महाराष्ट्रात शिमगा म्हणतात याचाच अर्थ भारतात जरी वेगवेगळे प्रांत असले तरी संस्कृती मात्र एकच आहे. यंदा होळीच्या दिवशी चंद्रग्रहण असल्याने होळीचा सणाबद्दल संभ्रम आहे.
पंचांगानुसार यंदा (Holika Dahan Tithi 2025) फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी 13 मार्च 2025 सकाळी 10.35 वाजेपासून दुसऱ्या दिवशी 14 मार्च 2025 ला दुपारी 12:23 वाजेपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार होलिका (holika dahan date) दहन 13 मार्च 2025 ला असणार आहे. पौर्णिमा तिथीला चंद्रग्रहण असून ते भारतात दिसणार नाही. त्यामुळे याचा परिणाम होळीवर होणार नाही.
होलिका दहन शुभ मुहूर्त - 13 मार्च 2024 - रात्री 10.45 वाजेपासून रात्री 01.30 वाजेपर्यंत
तर होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा करण्यात येतो. या दिवशी रंगांची मुक्त उधळण केली जाते. धुलिवंदन 14 मार्च 2025 ला असणार आहे. तर महाराष्ट्रात काही भागात रंगपंचमीला रंगांचा खेळ खेळला जातो. यावर्षी रंगपंचमी 19 मार्च 2024 ला साजरी करण्यात येणार आहे.
होलिका दहनाच्या दिवशी ‘ॐ त्र्यंबकम यजमाहे सुगंधीं पुष्टीवर्धनम्’. ‘उर्वारुकमिव बंधनं मृत्युोर्मक्षिय ममृतात्’ या मंत्राचा जप करावा. या शिवाय होलिका दहनावेळी गायत्री मातेचा महामंत्र ‘ॐ भुर्भुव: स्वा: तत्सवितुर्वरेण्यम् भर्गो देवस्य धीमहि धियो यो न: प्रचोदयात’ या मंत्राचाही जप करावा.
होळीचा सण हा दानव राजा हिरण्यकश्यपू, विष्णुभक्त प्रल्हाद आणि राक्षसी होलिका यांच्याशी जोडला गेला आहे. पुराणात अशी आख्यायिका आहे की, एकेकाळी हिरण्यकश्यपू नावाचा राजा पृथ्वीवर राज्य करायचा. तो भगवान विष्णूंचा कट्टर विरोधक होता, असं म्हटलं गेलं आहे. पण, त्याचा मुलगा प्रल्हाद हा विष्णूंची भक्ती करायचा. तो रात्रंदिवस विष्णुची पूजा करायचा. मुलगा विष्णूभक्त असल्यामुळे हिरण्यकश्यपू त्रस्त झाला. त्याने अनेकदा प्रल्हादला मारण्याचा प्रयत्नही केला. पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी होत असे. एकदा हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला मारण्याची जबाबदारी आपली बहीण होलिकेला दिली. होलिकेनी प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्याचे आदेश हिरण्यकश्यपूने देण्यात आले. होलिकाला अग्नीत बसून काहीही होणार नाही असं वरदान देण्यात आलं होतं. पण भगवान विष्णूंच्या कृपेने प्रल्हादाला काही झालं नाही, पण होलिका आगीच्या ज्वाळांमध्ये भस्म झाली. तेव्हापासून होलिका दहन हा दिवस चांगल्याचा वाईटावर विजय साजरा करण्यात येतो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)