Marathi News> भविष्य
Advertisement

Raksha Bandhan 2025 : राखी बांधताना बहिण 3 गाठी का बांधतात?; यामागे आहे धार्मिक कारण

Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधनाला बहीण भावाला राखी बांधतात. तज्ज्ञ सांगतात की, बहिणींनी भावाला राखी बांधताना तीन गाठी बांधल्या पाहिजे. त्यामागे धार्मिक कारण जाणल्यास परंपरेला अजून महत्त्व प्राप्त होईल.   

Raksha Bandhan 2025 : राखी बांधताना बहिण 3 गाठी का बांधतात?; यामागे आहे धार्मिक कारण

Raksha Bandhan 2025 : भाऊ-बहिणींमधील पवित्र बंधनाचे प्रतीक रक्षाबंधन मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येणार आहे. शनिवारी 9 ऑगस्ट 2025 ला रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात येणार आहे. रक्षाबंधनाला बहीण भावाच्या घरी राखी बांधण्यासाठी येते. धर्मशास्त्रात प्रत्येक नियमामागे विशेष कारण आहे. त्यातील महत्त्वाचे जेव्हा बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते तेव्हा तिला तीन गाठी बांधण्यास सांगितलं जातं. या नियमामागेही धार्मिक कारण आहे. खरं तर, त्यामागे एक कारण आहे जे अध्यात्मात रुजलेले आहे. (Why do sisters tie 3 knots while tying Rakhi religious reason in marathi Raksha Bandhan )

राखी बांधताना बहिण 3 गाठी का बांधतात?

ज्योतिषचार्य आनंद पिंपळकर राखीमधील तीन गाठींमागील अर्थ आणि महत्त्व सांगितले आहेत. हिंदू धर्मग्रंथांनुसार, तीन गाठी त्रिदेव - ब्रह्मा, विष्णू आणि महेश (शिव) यांचे प्रतिनिधित्व करतात, असं पिंपळकर सांगतात. निर्मिती, संरक्षण आणि संहाराचे तीन सर्वोच्च देवता. प्रत्येक गाठी भावासाठी त्यांच्या आशीर्वाद आणि संरक्षणाची विनंती दर्शवते. 

पहिली गाठ (ब्रह्मा): निर्मितीचे आणि एका पवित्र बंधनाच्या सुरुवातीचे प्रतीक आहे.
दुसरी गाठ (विष्णु): जीवनात संरक्षण आणि संतुलन दर्शवते.
तिसरी गाठ (शिव): शक्ती आणि नकारात्मकतेचा नाश दर्शवते.

या तीन गाठी बांधून, बहीण तिच्या भावाला दैवी संरक्षणाची ढाल देते, त्रिदेवाच्या शक्तींना आवाहन करते की ते त्याला हानीपासून वाचवते. यातील पहिली गाठ ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी बांधावी. दुसरी गाठ ही बहिणीने आपल्या दीर्घायुष्यासाठी बांधावी. तर तिसरी गाठ ही भावा बहिणीच्या प्रेम आणि गोडवा कायम राहावा यासाठी बांधली जाते. 

'ही' राखी चुकूनही बांधू नका भावाच्या मनगटावर

ज्योतिषचार्य आनंद पिंपळकर सांगतात की, काळ्या धाग्याची राखी बहिणीने भावाच्या मनगटावर बांधू नका. राखी नेहमी रेशमी धाग्यांनीच असावी. यासोबतच आजकाल अशी फॅशन झाली आहे की राखीवर राधाकृष्ण, शिवलिंग किंवा देवाच्या नावाचा कोणताही शब्द असेल तर अश्या राख्या अजिबात बांधू नका. असे केल्याने भाऊ आणि बहीण दोघांवरही विपरीत परिणाम होतो. प्लास्टिकपासून बनवलेली राखी अजिबात वापरू नये. याचा नकारात्मक परिणाम बहीण भावाच्या आयुष्यावर पडतो. जुनी किंवा तुटलेली राखी अजिबात बांधू नका, कारण तुटलेल्या वस्तू कोणत्याही पूजेत वापरल्या जात नाहीत.

हेसुद्धा वाचा - Raksha Bandhan 2025 : रक्षाबंधन बहीण भावाच्या प्रेमाचा सण, मग पतीच्या मनगटावर पत्नी राखी बांधू शकते का?

रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त 2025 काय?

रक्षाबंधन शनिवार, 9 ऑगस्ट 2025 रोजी साजरा करण्यात आला आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 वाजेपासून 9 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 1:24 वाजेपर्यंत असणार आहे. 9 ऑगस्ट रोजी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दृक पंचांगानुसार सकाळी 5:47 ते दुपारी 1:24 या वेळेत आहे. शास्त्रानुसार यावेळी संध्याकाळीही बहीण भावाला राखी बांधू शकते. 

राखी पौर्णिमाला राखी बांधण्याचे नियम काय?

राखीच्या दिवशी भावाला ओवाळण्यासाठी त्याला पाटावर बसवा. या पाटाखाली आणि त्याचा भोवती रांगोळी काढा. आता भावाला कुंकू आणि अक्षता लावा. त्यानंतर सोन्याची अंगठी आणि सुपारीने औक्षण करा. त्यानंतर भावाच्या मनगटावर राखी बांधा. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More