Vat Savitri Vrat 2025 :
सावित्री ब्रम्ह वादिनी सर्वदा प्रिय भाषिणी
तेन सत्येनमां पाहि दु:खसंसार सागरात
अवियोगी यथा देव सावित्र्या सहितस्य ते
अवियोग तथास्माकं भूयात जन्म जन्मनि
विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी वैवाहिक जीवनासाठी वट सावित्री व्रत पाळतात. या दिवशी सावित्री आणि सत्यवानाच्या पूजेसोबतच वडाच्या झाडाचीही पूजा केली जाते. या व्रतामध्ये अशी आख्यायिका आहे की, सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला. सत्यवानाला एक वर्षाच्या अंती मृत्यू येणार आहे, असं नारद मुनींनी तिला सांगितलं होतं. नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या पूर्व तीन दिवस तिने उपवास सुरू केलं. तो लाकडे, फुलं, फळं आणण्याकरिता अरण्यात गेला असता. सावित्री त्याच्या बरोबर गेली. ते वानातील शोभा पहात पहात चालले होतं, पण सावित्रीने मन मात्र जागेवर नव्हतं. सत्यवानाने सर्व फळं गोळा केली, वाळलेली लाकडे तोडण्यासाठी तो झाडावर चढला, नंतर त्याला चक्कर यायला लागली आणि तो घाबरला. डोळ्यापुढे अंधार वाढू लागला. सावित्री पतीला म्हणाली, नाथ, आपण थोडा वेळ विश्रांती घ्या म्हणजे आपणास बरं वाटेल. सत्यवान सावित्रीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला.
इतक्या तिला समोरून एक दिव्य पुरुष येतांना दिसला. क्षणात त्याने आपले मृत्यूपाश सत्यवानाचे प्राण हरणकरण्याकरिता टाकले. हे पाहून सावित्रीने त्या दिव्यपुरूषाच्या चरणावर मस्तक ठेवलं. त्या दिव्यपुरूषाला नमस्कार केला आणि तिने विचारले की तुम्ही कोण आहात. तेव्हा तो पुरूष म्हणाला, मी प्राणहरण करणारा यमराज आहे. हे ऐकून सावित्री त्याच्या पाठोपाठ जाऊ लागली.
हे पाहून यमराज म्हणाले सावित्री तू पतिव्रता आहेस, तू धार्मिक आहेस, तुझ्या पतीसेवेवर मी प्रसन्न आहे. तेव्हा जो पाहिजे तो वर माग. तेव्हा तिने आपल्या पतीचे प्राण परत यावे असा वर मागितला आणि चमत्कार झाला. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. सावित्रीची पतीवर किती निष्ठा आहे याची ही परीक्षा होती. यावरून सावित्रीने पतीनिष्ठा आणि पतिव्रता या गुणांनी प्रत्यक्ष यमराजाला हरवलं.
देशाच्या वेगवेगळ्या भागात वट सावित्री व्रत वेगवेगळ्या तारखांना साजरी केली जाते. पश्चिम भारतात हा व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला पाळला जातो, तर उत्तर भारतात हा व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरा करण्यात येतो. पण उपवास करण्याची पद्धत जवळजवळ सर्वत्र सारखीच आहे. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळल्या जाणाऱ्या वट सावित्री व्रताला वट सावित्री पौर्णिमा असेही म्हणतात. नारद पुराणानुसार, वट सावित्री व्रत ज्येष्ठ अमावस्या किंवा ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाऊ शकते.
वट सावित्री अमावस्या 26 मे 2025 रोजी आहे. अमावस्या तिथी 26 मे 2025 रोजी दुपारी 12.11 वाजेपासून 27 मे 2025 रोजी सकाळी 8.31 वाजेपर्यंत असणार आहे.
यावर्षी वट सावित्री पौर्णिमा मंगळवार 10 जून 2025 रोजी आहे. पौर्णिमा तिथी 10 जून 2025 रोजी सकाळी 11.35 वाजेपासून दुपारी 01.13 वाजेपर्यंत असणार आहे.
अमावस्येला वट सावित्री व्रत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, पंजाब आणि हरियाणामध्ये पाळले जाते. तर महाराष्ट्र, गुजरात आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये पौर्णिमेचा उपवास, सावित्री उपवास साजरा केला जातो.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)