Vaishakh Purnima 2025: हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व मानले जाते. वैशाख महिन्यातील पौर्णिमा अत्यंत पुण्यपूर्ण मानली जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. म्हणूनच वैशाख पौर्णिमेला पीपल पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात. या वर्षी बुद्ध पौर्णिमा १२ मे रोजी येत आहे. असे मानले जाते की, या पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो, कारण भगवान विष्णू स्वतः पिंपळाच्या झाडात राहतात.
भगवान बुद्धांचा जन्म - धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूचा नववा अवतार भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता. असे मानले जाते की, भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणूनच पिंपळाला 'बोधीवृक्ष' असेही म्हणतात. भगवान बुद्धांनी या झाडाखाली ६ वर्षे ध्यान केले आणि पौर्णिमेच्या दिवशी त्यांना बोध प्राप्त झाला.
ग्रहदोषांपासून मुक्तता - पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. शनि, गुरु, राहू-केतू यांसारख्या ग्रहांच्या शांतीसाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे फायदेशीर मानले जाते.
वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करा. यानंतर, पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून, पिंपळाच्या झाडाला तीन वेळा प्रदक्षिणा घाला. अशी धार्मिक श्रद्धा आहे की, सकाळी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव पिंपळाच्या झाडावर निवास करतात. तर, दिवसा देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)