Para Asian Games: चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियाई स्पर्धेत (Para Asian Games 2023) एकेरी तिरंदाजी स्पर्धेत तिरंदाज शीतल देवीने कमाल केलीय. जगातील पहिल्या हात नसलेल्या तिरंदाज शीतल देवीने (Sheetal Devi) भारताच्या शिरपेचात नवा मानाचा तुरा खोचलाय. श्री माता वैष्णोदेवी साइन बोर्डच्या स्पोर्ट्स स्टेडियमची स्टार खेळाडू, हात नसलेल्या शीतल देवीने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. शीतल देवीने शुक्रवारी भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले. तिने महिलांच्या वैयक्तिक कंपाऊंड खुल्या स्पर्धेत सिंगापूरच्या अलीम नूर सयहिदाचा 144-142 गुणांनी पराभव केला. आशियाई पॅरा गेम्स 2023 मधील शीतल देवीचे हे तिसरे पदक आहे. यापूर्वी तिने पॅरा तिरंदाजी मिश्र सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि महिला दुहेरी कंपाउंड स्पर्धेत रौप्य पदक जिंकले आहे.
चीनमध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्समध्ये 3 पदके जिंकणारी 16 वर्षीय शीतल देवी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड येथील रहिवासी आहे. जागतिक तिरंदाजीनुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करणारी शीतल देवी हात नसलेली पहिली महिला तिरंदाज आहे. शीतल देवीने मिश्र दुहेरी आणि एकेरीमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तर महिला दुहेरीत तिने रौप्यपदक पटकावले आहे.
दोन्ही हात नसतानाही छाती, दात आणि पाय यांच्या सहाय्याने तिरंदाजी जम्मू-काश्मीरची तिरंदाज शीतल देवी हिने यापूर्वी राकेश कुमारसह पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेच्या मिश्र कंपाउंड स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. शीतलने बुधवारी रौप्यपदकही पटकावले होते. यासह भारताच्या पदकांची संख्या 60 च्या पुढे गेली आहे.
Sheetal Devi Wins First of the Day for
— SAI Media (@Media_SAI) October 27, 2023
The Phenomenal Archer delivers a scintillating performance, clinching the coveted GOLD in Women's Individual Compound Open event, defeating Alim Nur Syahidah from Singapore in a breathtaking match!
Sheetal's victory fills our… pic.twitter.com/dehBoXvbSZ
कसे भेदते लक्ष्य?
शीतल उजव्या पायाने 27.5 किलो वजनाचा धनुष्य तोलून धरते. ती तिच्या उजव्या खांद्याला जोडलेल्या मॅन्युअल रिलीझरचा वापर करून स्ट्रिंग मागे खेचते आणि 50 मीटर अंतरावरील लक्ष्यावर बाण मारण्यासाठी तिच्या तोंडात धरलेले ट्रिगर वापरते. या दरम्यान, ती संपूर्ण वेळ डाव्या पायाने स्वतःला सीटवर सरळ ठेवते.
शीतलचा जन्म फोकोमेलियासह झाला होता. हा एक दुर्मिळ जन्मजात विकार आहे ज्यामुळे अवयवांचा विकास होत नाही. सुरुवातीला मला धनुष्य नीट उचलताही आला नाही, पण काही महिन्यांच्या सरावानंतर हे सगळं सोपे झाले, असे शीतलने सांगितले.
शीतल देवीचा तिरंदाज म्हणून प्रवास 2021 मध्ये सुरू झाला जेव्हा तिने किश्तवाडमध्ये भारतीय सैन्याच्या युवा कार्यक्रमासाठी नोंदणी केली होती. शितलने तिच्या क्रीडा कौशल्यामुळे स्काऊट्सचे लक्ष वेधून घेतले. त्यानंतर शीतलने कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्ड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये प्रशिक्षण घेणार असल्याचे ठरले. अभिलाषा चौधरी आणि कुलदीप वेदवान या प्रशिक्षकांनी तिला प्रशिक्षण दिलं होतं.