Rawalpindi Cricket Stadium : भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव खूप वाढला असून पाकिस्तानने 8 मे रोजी केलेल्या हल्ल्याचं प्रतिउत्तर देत असताना भारताने लाहोर सह अनेक ठिकाणांवर हल्ला केला. यात भारताकडून हॅरोप ड्रोनचा वापर करण्यात आला असून या ड्रोन हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्ध्वस्त झालं आहे. या स्टेडियमवर गुरुवारी पाकिस्तान क्रिकेट लीगचा सामना होणार होता. मात्र आता स्टेडियमचं मोठं नुकसान झाल्यामुळे रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणारे सर्व PSL सामने रद्द करण्यात आले आहेत. तसेच भारत - पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे पाकिस्तानमध्ये सुरु असलेली टी 20 क्रिकेट लीग रद्द केली जाऊ शकते.
पाकिस्तानात पाकिस्तान सुपर लीग 2025 सुरु आहे. या टी 20 लीगचा सामना आज रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणार होता, मात्र भारताच्या हल्ल्यात रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम उद्धवस्त झाल्याने आज होणारा PSL चा सामान रद्द झाला आहे. PSL मध्ये आज पेशावर झालमी विरुद्ध कराची किंग्स यांच्यात सामना होणार होता. रात्री 8: 30 या सामन्याला सुरुवात होणार होती मात्र आता हा सामना रद्द करण्यात आला आहे. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवरील हल्ल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने PSL चा भाग असलेल्या देश आणि विदेशातील खेळाडूंना तात्काळ रावळपिंडी सोडून जाण्यास सांगितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कराची, दुबई किंवा दोहामध्ये PSL चे उर्वरित सामने होऊ शकतात.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये झालेल्या नुकसानानंतर पाकिस्तान सुपर लीगमधून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची कमाई होत होती. त्यामुळे पाकिस्तान सुपर लीग रद्द होणं हे त्यांच्यासाठी खूप नुकसानदायक आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढलेल्या तणावांतर PSL पाकिस्तानच्या बाहेर खेळवण्याची तयारी सुरु झाली आहे. यासाठी कराची, दुबई आणि दोहा या शहरांचा विचार केला जातोय.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर सुद्धा PSL ही टी 20 लीग सुरु राहील असे सांगितले होते. पण आता परिस्थिती बिघडली असून यावर पुनराविचार केला जात आहे. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांसहित अनेक विदेशी खेळाडू त्यांच्या मायदेशात परत जाऊ इच्छित आहेत. याच दरम्यान इंग्लंड क्रिकेट बोर्डाने देखील मिटिंग बोलवल्याची माहिती मिळतेय. डेविड विली आणि क्रिस जॉर्डन हे दोन पहिले विदेशी खेळाडू होते ज्यांनी मायदेशात परतण्याची इच्छा व्यक्त केली होती.