Cricket News : आयपीएल 2025 च्या फायनलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) पंजाब किंग्सवर विजय मिळवून आयपीएलच्या इतिहासात प्रथमच विजेत्या ट्रॉफीवर नाव कोरलं. मात्र यंदा चॅम्पियन ठरलेला आरसीबी संघ आणि त्यांचे खेळाडू कोणत्या न कोणत्या कारणामुळे वादात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच आरसीबीचा स्टार गोलंदाज यश दयालवर (Yash Dayal) लैंगिक अत्याचाराचे आरोप झाले होते. आता आरसीबीचा एक विदेशी खेळाडू वादात अडकला आहे. त्याच्यावर सामन्यादरम्यान नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप लावण्यात आला होता.
वाइटॅलिटी ब्लास्टमध्ये मागच्या शुक्रवारी 4 जुलै रोजी नॉर्थैम्पटनशायर स्टीलबॅक्स विरुद्ध लंकाशायर लाइटनिंग सामन्यात विजयाच्या टार्गेटचा पाठलाग करताना फिल सॉल्ट मैदानात आला. त्यावेळी पहिल्या ओव्हरच्या सुरुवातीला फिल सॉल्टच्या बॅटचा आकार मोजण्यासाठी अंपायरने बॅट-गेज टेस्टचा वापर केला. ही एक नियमित प्रक्रिया होती, यामधून हे पाहिलं जातं की फलंदाज वापरात असलेली बॅट ही निर्धारित नियमांनुसार आहे की नाही? मात्र अंपायरने जेव्हा फिल सॉल्टची बॅट तपासली तेव्हा ती बॅट-गेज टेस्टमधून पास झाली नाही. त्यामुळे ही बॅट घेऊन तुम्ही खेळू शकणार नाही असे अंपायरने सांगितले.
पहिल्यांदाच बॅट-गेज टेस्टमध्ये फेल झाल्यावर फिल सॉल्ट सामना संपल्यावर पुन्हा एकदा अंपायरकडे तीच बॅट घेऊन गेला. पण आश्चर्याची गोष्ट ही की यावेळी तीच बॅट गेज टेस्टमधून पास झाली. त्यानंतर अंपायरनी फिल सॉल्टच्या बॅटला पुढे तपासणीसाठी पाठवले आहे.
हेही वाचा : 'इंग्लंडच्या पराभवानंतर विराटला येतेय भारतीय ड्रेसिंग रुमची आठवण', 'त्याला तिसऱ्या क्रमांकावर...'
लंकाशायर काउंटी क्रिकेट क्लबने हे स्पष्ट केलंय की, इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या (ECB) भ्रष्टाचार विरोधी संहितेचे उल्लंघन केल्या प्रकरणाच्या आरोपातून फिल सॉल्ट यांना मुक्त करण्यात आले आहे. फिल सॉल्टने दावा केला होता की तो मागील दोन वर्षांपासून याच बॅटने खेळतोय. त्याने हिच बॅट इंग्लंड, लंकाशायर आणि आयपीएलमध्ये खेळताना वापरली होती. पण त्यावेळी कोणताही आक्षेप घेण्यात आला नाही. क्लब आणि खेळाडू दोघांचाही असा विश्वास होता की सामन्यानंतरच्या चाचणीने हे प्रकरण सोडवायला हवे होते.