Ind vs Eng Test Series 2025: भारत आणि इंग्लंडदरम्यान खेळवण्यात येणाऱ्या पतौडी ट्रॉफी कसोटी स्पर्धेतील पहिला सामना 20 जून रोजी लीड्सवर खेळवला जाणार आहे. या मालिकेकडे भारतातील सर्वच क्रिकेट चाहत्यांचं विशेष लक्ष असणार आहे. या मालिकेत संघाचं नेतृत्व शुभमन गीलकडे सोपवण्यात आलं आहे. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधारपद शुभमनकडे सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर आठवड्याभरातच विराट कोहलीनेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 च्या नव्या सायकलमधील भारताच्या पहिल्याच कसोटी दौऱ्या आधी रोहित आणि विराटसारख्या अनुभवी खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्याने भारतीय चाहत्यांबरोबरच संघ व्यवस्थापनालाही मोठा धक्का बसला असून आता या दोघांशिवायच संघाला मैदानात उतरावं लागणार आहे. भारतीय संघ मागील आठवड्यामध्येच इंग्लंडला पोहोचला आहे. सध्या तिथे भारतीय संघ कसून सराव करत आहे. भारतीय संघाने इथे सराव म्हणून एक इंट्रा स्वॉड सामनाही खेळला आहे. दरम्यान, दुसरीकडे विराट कोहलीसुद्धा आयपीएल 2025 चा चषक जिंकल्यानंतर आपल्या कुटुंबासहीत लंडनला गेला आहे. आयपीएलनंतर दोन दिवसांमध्येच विराट लंडनला निघून आला.
विराटने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याचं लक्ष या कसोटी मालिकेवर आहे. रिव्ह स्पोर्ट्सने पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमधूनही याबद्दल एक मोठा खुलासा झाला आहे. भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गील, उपकर्णधार ऋषभ पंत आणि अन्य काही भारतीय खेळाडूंना विराटने त्याच्या लंडनमधील घरी बोलावलं होतं. ही सर्व मंडळी सोमवारी भारतीय संघाचा इंट्रा-स्वाड सामना संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आरामाचा दिवस असल्याने विराटला भेटायला गेली होती, असं वृत्त आहे.
मात्र विराट आणि या खेळाडूंच्या भेटीगाठीदरम्यान काय चर्चा झाली याची माहिती समोर आलेली नाही. मात्र असा अंदाज बांधला जात आहे की, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेमध्ये शुभमनने आणि पंतने काय केलं पाहिजे आणि ही मालिका कशी जिंकता येईल याबद्दल या खेळाडूंनी विराटबरोबर चर्चा केली. हे सर्व खेळाडू विराटच्या घरी दोन तासांहून अधिक वेळ होते. या सर्व खेळाडूंची बैठक दोन तास सुरु होती. भारतीय संघ मंगळवारी लीड्समध्ये दाखल झाला आहे.