इंग्लंडचा जो रुट कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. नुकतंच त्याने ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू रिकी पाँटिगला मागे टाकत रेकॉर्ड मोडला आहे. दरम्यान यानिमित्ताने त्याने मागील अनेक काळापासून पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या सचिन तेंडुलकरप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपण मोठे होताना त्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला होता असं त्याने सांगितलं आहे. तसंच 2012 मध्ये पदार्पणाच्या सामन्यात सचिन तेंडुलकरसोबत मैदान शेअऱ केल्याची आठवणही जागवली.
जो रुटचा 1989 मध्ये जन्म झाला तेव्हा सचिन तेंडुलकर आधीच एक महान खेळाडू झाला होता. जगातील प्रत्येक क्रिकेटप्रेमी घरात त्याचं नाव आदराने घेतलं जात होतं. "माझा जन्म होण्याआधी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याच्यासोबत एकाच मैदानात खेळणं, त्याच्याविरोधात खेळण्याची संधी मिळणं हा फार जबरदस्त अनुभव होता," असं त्याने BBC Sport शी संवाद साधताना म्हटलं.
पुढे त्याने सांगितलं की, "मी मोठा होताना त्याला पाहत, त्याचा आदर्श ठेवत शिकण्याचा प्रयत्न करत होतो. त्याच्यासोबत एकाच मैदानात खेळताना, त्याला त्या मालिकेत सर्व गोष्टी करताना पाहणं एक विलक्षण अनुभव होता. मी ते कधीच विसरणार नाही".
इंग्लंडच्या भारत दौऱ्यादरम्यान नागपूरमध्ये रूटने पदार्पण केलं होतं. ही मालिका सचिनच्या क्रिकेट करिअरमधील अखेरच्या मालिकांपैकी होती. एका दशकाहून अधिक काळानंतर, यॉर्कशायरच्या जो रुटने 157 कसोटी सामन्यांमध्ये 13 हजार 409 धावा केल्या आहेत. राहुल द्रविड, जॅक कॅलिस आणि रिकी पाँटिंगसारख्या महान खेळाडूंना त्याने मागे टाकलं आहे. सर्वकालीन महान फलंदाज मानल्या जाणाऱ्या तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यांमध्ये 15 हजार 921 धावा करून निवृत्ती घेतली होती.
तेंडुलकरच्या सर्वकालीन विक्रमाला आव्हान देण्याचा प्रयत्न असेल का? असं विचारलं असता त्याने सांगितलं की, "मी यावर लक्ष केंद्रित करत नाही. अशा गोष्टी स्वतःच सांभाळल्या पाहिजेत. आपलं ध्येय सामने जिंकणे, प्रथम फलंदाजी करत असल्यास त्यांना सेट करणं किंवा दुसऱ्या डावात असल्यास आव्हानाचा पाठलाग करणं हे असलं पाहिजे. ते थोडे कंटाळवाणं किंवा पद्धतशीर वाटेल, परंतु शेवटी इंग्लंडला जिंकण्यास मदत करण्यासाठी मला तेच करावे लागेल आणि म्हणूनच आम्ही खेळ खेळतो."
मँचेस्टर कसोटीत इंग्लंडच्या पहिल्या डावात रूटने 120 धावा केल्या आणि रिकी पाँटिंगच्या 13 हजार 387 धावांचा टप्पा ओलांडला. त्याआधी याच खेळीत त्याने द्रविड आणि कॅलिसलाही मागे टाकलं होतं. आपल्या कामगिरीबद्दल बोलताना त्याने रिकी पाँटिंगबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. "मी आज सकाळी रिकी पॉन्टिंगला पाहिले. रिकी हा असा खेळाडू आहे ज्याचे मी कौतुक करत, पाहत, अनुकरण करण्याचा प्रयत्न करत मोठा झालो. मी बागेत किंवा माझ्या स्थानिक क्लबमध्ये त्याच्या पुल शॉटची नक्कल करण्याचा प्रयत्न करायचो, तो त्यासाठी जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे त्या खेळाडूंबद्दल एकाच वेळी बोलणे देखील खूप छान आहे," असं तो म्हणाला.
ओल्ड ट्रॅफर्डमधील प्रेक्षकांनी रूटच्या कामगिरीचं उभं राहून टाळ्या वाजवत कौतुक केलं. "सर्वप्रथम फलंदाजीसाठी हा एक उत्तम दिवस होता. संपूर्ण मैदान अशाप्रकारे तुमच्यासाठी उभं राहत असल्याचा अनुभव खास आहे. पण त्याच वेळी, तुमच्यावर आणखी चांगलं काम करण्याची जबाबदारी येते. मोठ्या मालिकेतील हा एक मोठा क्षण असतो आणि शेवटी, तुम्ही त्यासाठीच खेळता: तुमच्या संघाला जिंकण्यास मदत करणे, मग ते सामन्याची तयारी असो किंवा धावांचा पाठलाग असो. प्रेक्षकांची प्रतिक्रिया स्पष्टपणे खूपच हृदयस्पर्शी होती," असं तो म्हणाला.