Olympic gold medalist Arshad Nadeem: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत पाकिस्तानला भालाफेकीत पहिले सुवर्णपदक मिळवून देणारा अर्शद नदिम सध्या चर्चेत आहे. भारताचा स्टार ऍथलीट नीरज चोप्राला पराभूत करत नदिमने 92.97 मीटर भाला फेकून ऑलिम्पिक विक्रम मोडला. मात्र, या यशानंतर सरकारकडून जाहीर झालेली सर्व बक्षिसं त्याला मिळालेली नाहीत, असा धक्कादायक खुलासा खुद्द नदिमने केला आहे.
अर्शद नदिमने जिओ टीव्हीशी बोलताना सांगितले की, "माझ्यासाठी जाहीर करण्यात आलेली बरीचशी बक्षिसं केवळ घोषणांपुरतीच मर्यादित राहिली आहेत. विशेषतः मला प्लॉट देण्यात येईल असे सांगण्यात आले होते, पण आजतागायत मला एकही प्लॉट मिळालेला नाही. फक्त रोख बक्षिसं मिळाली आहेत." पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी नदिमला कोणतीही सरकारी मदत मिळाली नव्हती. मात्र, सुवर्णपदक जिंकल्यानंतर त्याच्यावर बक्षिसांची आणि सन्मानांची खैरात केली गेली होती. पण प्रत्यक्षात या बक्षिसांपैकी बहुतेक केवळ कागदावरच राहिली असल्याचे त्याने सांगितले.
नदिम सध्या युनायटेड किंगडममध्ये आपल्या हॅमस्ट्रिंगच्या शस्त्रक्रियेसाठी गेला आहे. त्याने सांगितले की, "माझं संपूर्ण लक्ष स्वतःच्या सरावावर आहे. पण त्याचबरोबर जे तरुण माझ्याकडे प्रशिक्षणासाठी येतात, त्यांनाही आम्ही प्रशिक्षित करतो. माझे प्रशिक्षक सलमान बट हे त्यांचं मार्गदर्शन करतात."
अर्शद नदिमची दुखापतीनंतर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून, तो 16 ऑगस्टला पोलंडमध्ये होणाऱ्या सिलेसिया डायमंड लीग स्पर्धेसाठी सज्ज होतोय. जर तो वेळेत तंदुरुस्त झाला, तर त्याचं पुन्हा एकदा नीरज चोप्राशी थेट सामना होणार आहे. पॅरिस ऑलिम्पिकनंतर हे दोघे प्रथमच एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. नीरज चोप्रा मात्र या काळात सातत्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. त्याने यंदाच्या हंगामात मे महिन्यात दोहामध्ये 90 मीटरचा टप्पा पार केला.
दुसरीकडे नदिमने मात्र यंदा फारशा स्पर्धा खेळल्या नाहीत. आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत दक्षिण कोरियामध्ये त्याने 86.40 मीटर भालाफेक करत सुवर्ण जिंकलं होतं. नीरज चोप्राने त्याला 'NC Classic' स्पर्धेसाठी आमंत्रित केलं होतं, पण तेव्हा त्याने तारखा न जुळल्याने नकार दिला होता. नंतर ही स्पर्धा पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर स्थगित करण्यात आली होती.