Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'विराटला अडचणीत आणलं तर...'; भारत-पाकिस्तान सामन्याच्या Winner संदर्भात भाकित

Asia Cup 2023 India vs Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा हाय व्होल्टेज सामना 2 सप्टेंबर रोजी होणार असून या सामन्यापूर्वीच एका माजी विश्वविजेत्या खेळाडूने कोणता संघ जिंकेल आणि कोणता पराभूत होईल हे कशावर अवलंबून असेल याबद्दल भाष्य केलं आहे.

'विराटला अडचणीत आणलं तर...'; भारत-पाकिस्तान सामन्याच्या Winner संदर्भात भाकित

Asia Cup 2023 India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान आशिया चषक 2023 मध्ये होणारा सामना अवघ्या 2 दिवसांवर असतानाच या सामन्याबद्दलची सोशल मीडियावर तुफान चर्चा दिसत आहे. आतापासूनच या सामन्यासंदर्भातील हॅशटॅग चर्चेत आहेत. 2 सप्टेंबर रोजी श्रीलंकेमध्ये हे दोन्ही पारंपारिक प्रतिस्पर्धी संघ एकमेकांसमोर उभे ठाकतील. या सामन्यामध्ये कोण कोणावर बाजी मारणार याबरोबरच काही खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीकडेही विशेष लक्ष असणार आहे. आगामी काही आठवड्यांमध्ये असलेल्या एकदिवसीय क्रिकेट वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीकडे विशेष लक्ष असणार आहे. आशिया चषक 2023 मधील या दोघांची कामगिरी ही विश्वचषक स्पर्धेआधी भारतीय संघ कशी कामगिरी करेल याचा अंदाज वर्तवण्यासाठी पुरेशी असल्याचं मत अनेकांनी मांडला आहे. ऑस्ट्रेलिय विश्वविजेत्या संघातील माजी फिरकीपटू ब्रॅड हॉगनेही याबद्दल एक सूचक विधान केलं आहे.

सामना फारच रंजक असेल

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी विरुद्ध भारताच्या आघाडीच्या फलंदाजांची कामगिरी कशी असेल यावरच सामन्याचं भवितव्य ठरणार आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना हा भारताचा स्पर्धेतील पहिलाच सामना असणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कॅण्डी शहरातील पल्लेकेले येथील मैदानावर खेळवला जाणार आहे. मी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असल्याचं हॉगने म्हटलं आहे. पाकिस्तानी वेगवान गोलंदाजी विरुद्ध भारताची फलंदाजी असा हा सामना फारच रंजक असेल असं हॉगने म्हटलं आहे. 

डावखुरा गोलंदाज अन् उजव्या हाताचे फलंदाज

"मी नक्कीच हा सामना पाहणार आहे. क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात मोठ्या सामन्यांपैकी हा आहे. सध्या सगळीकडेच राजकारण हे खेळांच्या आड येत आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि सगळीकडेच हे होतंय. यामुळे आपण क्रिकेटच्या मैदानात 2 उत्तम संघांमधील संघर्षापासून मुकत आहोत. पाकिस्तानसाठीही हा सामना फार महत्त्वाचा असणार आहे कारण त्यांना यामधून अधिक एक्सपोजर मिळेल. हे असे संघर्ष झाले पाहिजेत. भारताची फलंदाजी फारच उत्तम आहे. तर पाकिस्तानची वेगवान गोलंदाजी सरस आहे. खास करुन शाहीन शाह आफ्रिदीची गोलंदाजी पाहण्यासारखी आहे. तो फार चांगला गोलंदाज आहे. तुमच्याकडे चेंडू वळवण्याचं कौशल्य असलेला, वेगवान गोलंदाजी करणारा डावखुरा गोलंदाज असेल आणि तो उजव्या हाताच्या फलंजाला गोलंदाजी करत असेल तर फार फरक पडतो," असं हॉगने 'बॅकस्टेज विथ बोरीया' कार्यक्रमात म्हटलं आहे.

पाहण्यासारखी स्पर्धा

शाहीन शाह आफ्रिदी आणि रोहित शर्मामधील स्पर्धा पाहण्यासारखी असेल हॉगने म्हटलं आहे. "उजव्या गोलंदाजाच्या विरुद्ध दिशेला वळणाऱ्या चेंडूंमुळे शाहीन शाह आफ्रिदीकडे अधिक संधी असेल असं मला वाटतं. पाकिस्तान सामन्याच्या सुरुवातीला विराट कोहलीला नवीन चेंडूने गोलंदाजी करताना शाहीन शाह आफ्रिदीच्या मदतीने अडचणीत आणू शकतो. आफ्रिदी आणि भारताच्या आघाडीच्या 3 फलंदाजांमध्ये होणारी स्पर्धा पाहण्यासारखी असेल. याच संघर्षामध्ये भारत आणि पाकिस्तान संघाचा विजेता कोण असेल हे निश्चित होईल असं मला वाटतं," असं हॉगने सांगितलं.

Read More