BAN vs SA Players Fight Viral Video: क्रिकेट असो किंवा इतर कोणताही खेळ असो अनेकदा खेळाच्या मैदानावर खेळाडूंचं स्वत:वरील नियंत्रण राहत नाही आणि त्यांच्या हातून काहीतरी भलतच घडून बसतं. मैदानामध्ये स्वत:वर संयम ठेवणं हे खेळाइतकं महत्त्वाचं आहे. मात्र अनेकदा खेळाडूंना हे समजत नाही आणि प्रकरण बाचाबाचीपासून ते अगदी हाणामारीपर्यंतही जाऊ शकतं. अशावेळेस बऱ्याचदा पंच मध्यस्थी करतात. क्रिकेटच्या मैदानामध्ये सामान्यपणे अगदी धक्काबुक्की आणि मारामारीपर्यंत प्रकरण जात नाही. अगदी अशा मोजक्या घटना पाहायला मिळतात जिथे क्रिकेटच्या मैदानावर खेळाडू एकमेकांना थेट हात लावतात. असाच प्रकार नुकताच पाहायला मिळाला. क्रिकेटच्या मैदानावरील हा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
बांग्लादेश विरुद्ध दक्षिण आफ्रिका असा इमर्जिंग टीम्सचा सामना सुरु असताना बाचाबाचीचं रुपांत धक्काबुकीकीमध्ये झालं. मैदानावरील हा सारा गोंधळ पाहून सर्व लोक थक्क झाले. सध्या दक्षिण आफ्रिकेची इमर्जिंग टीम बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे. येथील शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये अनऑफिशिअल कसोटी सामना खेळवला जात आहे. याच सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू शेपो एनटुली आणि बांगलादेशचा रिपोन मोंडोल या दोघांमध्ये अचानक वाद झाला. दोघांनी एकमेकांना केलेल्या बाचाबाचीवरुन प्रकरण इतकं पेटलं की त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली.
आधी दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने रिपोन मोंडोलला धक्का दिला. त्यानंतर रिपोनने हातातील बॅटने या खेळाडूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याने हल्ला करण्याच्या दृष्टीने बॅट उगारली मात्र पंच आणि इतर खेळाडूंनी त्याला रोखलं. मैदानावरील पंचांनी तातडीने मध्यस्थी करण्यासाठी धाव घेतल्याचं पाहायला मिळालं.
I have never seen such an incident in the history of cricket. A direct fight. What a shameful incident of cricket happened between the talented bowler Shepo Ntuli of South Africa and Ripon Mondal of Bangladesh. This is extreme. #BANevsSAe #CricketTwitter #Bangladesh #SouthAfrica pic.twitter.com/3CbMTHwUEA
— Monirul Ibna Rabjal (@to2monirul) May 28, 2025
मैदानावरील या धक्कादायक घटनाक्रमाचे पडसाद मैदानाबाहेर उमटले आहे. 'ईएसपीएन क्रिकइन्फो'च्या वृत्तानुसार सामन्यानंतर मॅच रेफरींनी या प्रकरणाचा अहवाल मागवला आहे. हा अहवाल दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांना पाठवला जाणार आहे. या अहवालाच्या आधारे खेळाडूंवर कारवाई केली जाणार आहे.
दोन्ही देशांच्या संघातील हा शेवटचा सामना होता. या दौऱ्यात तीन अनऑफिशिअल एकदिवसीय सामने खेळवण्यात आले. पाहुण्या संघाने 2 सामने जिंकले तर बांगलादेशला यापैकी एकच सामना जिंकता आला. तर दोन अनऑफिशिअल कसोटी सामन्यांपैकी पहिला सामना अनिर्णित राहिला आहे.