Jasprit Bumrah Not Playing 5th Test Replacement Found: भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या अँडरसन-तेंडुलकर चषक स्पर्धेतील शेवटचा कसोटी सामना 31 जुलैपासून सुरु होत आहे. या मालिकेमध्ये भारत 1-2 ने पिछाडीवर आहे. ओव्हल येथे पाचवी आणि शेवटची कसोटी जिंकून मालिका बरोबरीत आणण्याची आकर्षक संधी भारताकडे असतानाही, बीसीसीआयच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी भारताचा हुकूमी एक्क असलेल्या जसप्रीत बुमराहला ओव्हल कसोटीतून विश्रांती देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. 'ईएसपीएनक्रिकइन्फो'ने दिलेल्या माहितीनुसार, जगातील अव्वल गोलंदाज असलेल्या बुमराहला दीर्घकालीन नियोजनाचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. बुमराहच्या पाठीला दुखापत होऊ नये म्हणून अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटीत तो खेळणार नाही. मात्र बुमराहच्या जागी टीम इंडियाला तितकीच दमदार रिप्लेसमेंट मिळालीये.
मालिका सुरू होण्यापूर्वीच, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि स्वतः बुमराहबरोबरच भारतीय संघ व्यवस्थापनाने घोषणा केली होती की तो पाचपैकी फक्त तीन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल. बुमराहचे शरीर त्याला तीनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळू देणार नाही, असं सांगण्यात आलेलं. ऑस्ट्रेलियामध्ये बुमराह शेवटच्या कसोटीत खेळला तर त्याच्या पाठीच्या दुखापतीचा धोका आहे. असं झाल्यास त्याच्या कारकीर्दीवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.
तब्बेसंदर्भातील समस्या असूनही, बुमराहने ओव्हलमध्ये भारताला मालिकेत बरोबरी साधण्याच्या दृष्टीकोनातून मदत करण्यासाठी प्रयत्न करेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्याने नुकत्याच झालेल्या मँचेस्टरमधील चौथ्या कसोटीच्या चौथ्या दिवसापासून त्याने गोलंदाजी केली नव्हती. चौथ्या आणि पाचव्या कसोटीमध्ये फक्त तीन दिवसांचा ब्रेक, ओव्हलच्या मैदानावरील निर्जीव खेळपट्टी आणि कामाचे व्यवस्थापन यामुळे भारताने बुमराहसंदर्भात धोका पत्करण्यास तयार नसल्याचं स्पष्ट करत त्याला अंतिम कसोटीत प्लेइंग 11 मध्ये स्थान दिलं जाणार नाही, असं म्हटलंय.
मालिकेत आतापर्यंत भारताचा सर्वाधिक बळी घेणाऱ्या बुमराहने मँचेस्टरमध्ये 33 ओव्हर टाकल्या. फलंदाजीचे प्रशिक्षक सीतांशू कोटक यांनी मालिकेतील निर्णायक सामन्यात जसप्रीत बुमराहच्या सहभागाची शक्यता नसल्याचं म्हटल्यानंतर काही तासांतच बुमराहच्या अनुपस्थितीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं. "बुमराहवर जी जबाबदारी सोपवण्यात आली आहे ती पूर्ण करुन तो सध्या तंदुरुस्त आहे. त्याने गेल्या सामन्यात एकाच डावात गोलंदाजी केली आहे. त्यामुळे मुख्य प्रशिक्षक, फिजिओ आणि कर्णधार चर्चा करून निर्णय घेतील. सध्या तरी कोणतीही चर्चा झालेली नाही," असे कोटक यांनी सामन्याच्या दोन दिवस आधी सांगितलं होतं. आता त्यांची ही शक्यता खरी ठरली आहे.
ओल्ड ट्रॅफर्डमध्ये गंभीरने देखील, सर्व वेगवान गोलंदाज तंदुरुस्त आहेत, असं म्हटलं होतं. अर्शदीप सिंग आणि आकाश दीप दुखापतींमधून बरे झाले आहेत, असं गंभीरला सुचवायचं होतं. त्यामुळेच बुमरहाच्या जागी शेवटच्या कसोटीमध्ये पुन्हा फिट झालेल्या आकाश दीपला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. हे अर्शदीपचं कसोटीमधील पदार्पण ठरेल. मांडीच्या दुखापतीमुळे चौथी कसोटी न खेळलेला आकाश दीप पूर्ण तंदुरुस्त झाला असून संघात परतणार आहे. एजबॅस्टनमध्ये आकाश दीप भारताचा हिरो होता, जिथे त्याने दोन डावांमध्ये एकूण 10 बळी घेतले होते. अर्शदीप सिंगलाही त्याची कसोटी कॅप मिळण्याची शक्यता आहे. तो अंशुल कंबोजची जागा घेईल तर मोहम्मद सिराज सलग पाचवी कसोटी खेळेल हे निश्चित आहे. त्यामुळे तरुण गोलंदाजांवर भारताची भिस्त असेल हे निश्चित आहे.