Champions Trophy 2025 : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फिटनेसबाबत काँग्रेसच्या महिला नेता डॉ शमा मोहम्मद (Shama Mohamed) यांनी केलेलं एक वक्तव्य सध्या चर्चेत आहे. महिला नेत्याच्या या वक्तव्याचा रोहित शर्माचे फॅन्स आणि अनेक राजकीय मंडळींनी निषेध केला आहे. आयसीसी स्पर्धेच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या (Team India) कर्णधाराच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्याला जाड म्हणणे लज्जास्पद आहे अशी प्रतिक्रिया फॅन्स देत आहेत. अशातच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
काँग्रेसच्या महिला नेत्या डॉ शमा मोहम्मद यांनी एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली. ज्यात त्यांनी लिहिले की, 'एक खेळाडू म्हणून रोहित शर्मा जरा जाडजूड आहे त्याला वजन कमी करायची गरज आहे. सहाजिकच भारतीय क्रिकेट संघाचा तो आतापर्यंतचा सर्वात अकार्यक्षम कर्णधार आहे'. या पोस्टनंतर सोशल मीडियावर एक वादंग उठलं. शमा मोहम्मद यांनी वाढता रोष पाहता तातडीनं आपली पोस्ट डिलीटही केली. पण, तरीही त्यांच्या या पोस्टचा स्क्रीनशॉट मात्र आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सदर पोस्टची दखल भाजपनंही घेतली असून, BJP नेत्या राधिका खेडा यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर शाब्दिक तोफ डागली. खेडा यांनी काँग्रेसवर सातत्यानं, दशकानुदशकं खेळाडूंना अपमानित करण्याचा गंभीर आरोपही लावला.
हेही वाचा : सेमी फायनलमध्ये भारत 4 स्पिनर सह उतरणार? कॅप्टन रोहित 'या' खेळाडूंना देणार प्लेईंग 11 मध्ये संधी
बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी याप्रकरणी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'रोहित सारख्या खेळाडूवर केल्या जाणाऱ्या अशा तर्हेच्या टिप्पण्यांना जास्त महत्व देऊ नका. रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार आहे, तो सामने जिंकतोय, त्याच्या नेतृत्वात संघ सुद्धा चांगलं परफॉर्म करतोय, तो फिट आहे म्हणूनच तर खेळतोय. यावेळी त्याच्या फिटनेसबाबत बोलणे निरुपयोगी आहे. आपले खेळाडू सोशल मीडिया पाहत सुद्धा नाहीत, सोशल मीडियावर ही टीका सुरूच असते. रोहित शर्मा सध्या 4 मार्च रोजी होणाऱ्या सेमी फायनल सामन्यावर लक्ष केंद्रित करीत आहे'.
बीसीसीआय याबाबत कारवाई करणार का यावर राजीव शुक्ला म्हणाले की, 'सोशल मीडियावर लोक लिहीत राहतात. बीसीसीआयकडून मी स्पष्ट करतो की रोहित शर्मा पूर्णपणे फिट आहे. चांगल्या खेळाचे प्रदर्शन करतोय. शमी मोहम्मद यांना हे ट्विट करायला नको हवं होतं. त्यांच्या पक्षाने सुद्धा या वक्तव्यावर त्यांची पाठराखण केलेली नाही आणि स्वतःला यापासून वेगळं केलंय'.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये टीम इंडिया हा ग्रुप स्टेजमध्ये ए संघाचा भाग होता. यात भारतासोबत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा सहभाग सुद्धा होता. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील तीनही सामने मोठ्या फरकाने जिंकून ग्रुप ए च्या पॉईंट टेबलमध्ये प्रथम स्थान काबीज केले. त्यामुळे भारताने सेमी फायनलमध्ये धडक दिली असून यात भारताचा सामना हा ऑस्ट्रेलिया सोबत होणार आहे.