रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघ तब्बल 18 वर्षांनी आयपीएल जिंकला आहे, चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आपला हा विजय साजरा करण्यासाठी आरबीसीने शहरातून ओपन बस परेड काढण्याची योजना आखली होती. मात्र पोलिसांनी यासाठी नकार दिला आहे. यासाठी बंगळुरुमधील वाहतूक कोंडी कारणीभूत ठरली आहे. यामुळे आपल्या आयपीएल विजेत्या खेळाडूंना अभिवादन करण्याची चाहत्यांची संधी हुकणार आहे.
मंगळवारी रात्री अहमदाबादमध्ये पंजाबविरोधात सहा धावांनी विजय मिळवल्यानंतर आरसीबीने विजयी परेडची घोषणा केली होती. 4 जून रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास हा कार्यक्रम सुरु होणार होता. विधान सौधा येथून सुरू होऊन बेंगळुरूमधील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर ही परेड संपणार होती.
सुधारित वेळापत्रकानुसार, बंगळुरुमधील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर आरसीबी संघाचा सत्कार होणार आहे. सायंकाळी 5 ते 6 च्या सुमारास हा सत्कार कार्यक्रम पार पडेल. खेळाडू कर्नाटकचे माननीय मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची विधानसौध येथे भेट घेतील आणि तेथून थेट कार्यक्रमस्थळी जातील. वैध पास असलेल्यांनाच कार्यक्रमस्थळी प्रवेश मर्यादित असेल. स्टेडिअमभोवती मर्यादित पार्किंग उपलब्ध असल्याने उपस्थितांना मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- चिन्नास्वामी स्टेडियमवर संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत आरसीबी संघाचा सत्कार समारंभ होईल.
- फक्त तिकीट/पासधारकांनाच प्रवेश आहे.
- विजय परेड होणार नाही
- मर्यादित पार्किंगमुळे, लोकांना मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- सामान्य नागरिकांना दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत सीबीडी परिसरात जाण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
आरबीसीने अंतिम सामन्यात पंजाबचा पराभव करत पहिल्यांदा आयपीएलच्या जेतेपदावर आपलं नाव कोरलं. आयपीएलच्या अंतिम सामन्यातील विजयासह आरसीबीने तीन सामन्यांच्या पराभवाचा नकोसा रेकॉर्डही संपवला. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कृणाल पंड्याने केलेल्या उत्तम गोलंदाजीमुळे बंगळुरुला अंतिम सामना जिंकता आला.
2008 मध्ये आरसीबीमध्ये सामील झाल्यापासून विराट कोहलीला त्याच्या पहिल्या आयपीएल ट्रॉफीची चवही चाखता आली. कोहलीने 15 सामन्यांमध्ये 657 धावा करून आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारा तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणूनही स्थान मिळवले.