Bengluru Stampede : आयपीएल 2025 च्या फायनलनंतर बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियम बाहेर झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण (Central Administrative Tribunal) ने आपला निर्णय जाहीर केला आहे. CAT ने या प्रकरणाची चौकशी आणि तपास केला असून यानंतर त्यांनी आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला दोषी ठरवलं आहे. CAT ने म्हटले की, बंगळुरूमध्ये विजयोत्सव साजरा करण्यासाठी आरसीबीने पोलिसांकडून योग्य परवानगी घेतली नव्हती.
एनडीटीव्हीच्या एका रिपोर्टनुसार सेंट्रल ट्रिब्यूनलने निर्णय ऐकवला की, 'RCB ने पोलिसांकडून योग्यप्रकारे परवानगी मागितली नव्हती, अचानक आरसीबीकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यात आली आणि त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचतात मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली. वेळेअभावी पोलिस पूर्ण तयारी करू शकले नाहीत. यासोबतच, CAT ने म्हटले आहे की, 'पोलिसांकडून सुमारे 12 तासांच्या इतक्या कमी वेळेत सर्व व्यवस्था करण्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही'.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ मागील 18 वर्षांपासून आयपीएलचा भाग आहे. मात्र गेल्या 17 वर्षांमध्ये त्यांना एकदाही विजेतेपद जिंकण्यात यश आलेलं नव्हतं. मात्र आयपीएल 2025 मध्ये पंजाब किंग्सला फायनलमध्ये हरवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चॅम्पियन ठरला. यानंतर आरसीबीने विजयानंतर अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियमवर तर सेलिब्रेट केलंच मात्र सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमपर्यंत विजयी मिरवणूक काढली जाणार असेही जाहीर केले. मात्र चिन्नस्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 11 जणांचा मृत्यू आणि अनेक लोकं जखमी झाले, ज्यामुळे हा विजयाचा माहोल दुःखात बदलला.
हेही वाचा : मोहम्मद शमीला मोठा धक्का! हसीन जहाँला दर महिन्याला द्यावे लागणार तब्बल इतके लाख; हायकोर्टाचा आदेश
CAT कडून पोलीस प्रशासनाला बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली आहे. सांगितलं गेलं की, 'पोलीस सुद्धा माणूस आहेत, ते देव नाहीत किंवा कोणते जादूगार नाही. पोलिसांकडे अलादीनच्या चिराग प्रमाणे पॉवर्स नाहीत, जे केवळ चिरागवर बोटं फिरवून लोकांची इच्छा पूर्ण करतील'. या घटनेबाबत आरसीबी व्यवस्थापनाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. यापूर्वी, या घटनेसंदर्भात आरसीबी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनवर आरोप करण्यात आले होते, ज्यामुळे केएससीएचे सचिव ए. शंकर आणि कोषाध्यक्ष जयराम यांनी राजीनामा दिला होता.