Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी भारताला झटका, दोन बडे खेळाडू बाहेर

भारत आणि इंग्लंडच्या टी-२० सीरिजला ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या सीरिजआधी भारताला झटका, दोन बडे खेळाडू बाहेर

लंडन : भारत आणि इंग्लंडच्या टी-२० सीरिजला ३ जुलैपासून सुरुवात होणार आहे. पण या सीरिजआधीच भारतीय टीमला मोठा झटका बसला आहे. भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह आणि स्पिनर वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे बाहेर झाले आहेत. आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० दरम्यान फिल्डिंगवेळी बुमराहच्या डाव्या अंगठ्याला दुखापत झाली. दुखापतीनंतर बुधवारी बुमराह सरावासाठी आला पण त्यानं सराव केलाच नाही. बुमराहच्या हाताचं स्कॅनिंग करण्यात आलं आहे पण त्याचे रिपोर्ट अजूनही मिळालेले नाहीत. दुखापतीमुळे बुमराहला आयर्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०लाही मुकावं लागलं होतं. भारत आणि इंग्लंडमध्ये पहिले ३ टी-२० आणि मग ३ वनडे मॅचची सीरिज होणार आहे. १२ जुलैपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. वनडे सीरिजलाही बुमराहला मुकावं लागलं तर भारतासाठी हा मोठा धक्का असेल.

दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदर याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो टी-२० सीरिजमधून बाहेर झाला आहे. मंगळवारी मलाहाईडमध्ये फूटबॉलचा सराव करत असताना सुंदरला दुखापत झाली. बीसीसीआय लवकरच बुमराह आणि सुंदर या दोघांऐवजी नव्या खेळाडूंची घोषणा करणार आहे.

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजमध्ये भारताकडे भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हार्दिक पांड्या आणि सिद्धार्थ कौल हे पर्याय आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शार्दुल ठाकूर आणि दीपक चहर या दोघांची भारतीय टीममध्ये निवड होऊ शकते. 

Read More