Fraud On Name Of Ziva Dhoni: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावाने लाखो रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. विशेष म्हणजे ही फसवणूक करण्यासाठी धोनीची मुलगी झिवा हिच्या नावाचा वापर फसवणूक करणाऱ्यांनी केला. या प्रकरणामध्ये माटुंगा येथे पोलीस तक्रार दाखल करण्यात आली असून प्रकरणाचा तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धोनीच्या मुलीसोबत कॅडबरी ओरियो बिस्कीटच्या जाहिरातीसाठी तुमची निवड झाली असून त्यासाठी तुम्हाला काही पैसे भरावे लागतील असं फसवणुक झालेल्या दांपत्याला सांगण्यात आलं. यानंतर या दांपत्याकडून गंडा घालणाऱ्यांनी सव्वातीन लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर या दांपत्याने रविवारी (22 जून रोजी) माटुंगा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल केली आहे.
दांपत्याने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार, त्यांना गंडा घालणाऱ्या आरोपीने त्यांच्याशी डिस्नी किड्स इंडिया या कंपनीचा संचालक म्हणून संपर्क केला. सदर कंपनीची जाहिरात लोअर परळमधील एका मॉलमध्ये लावलेली होती. पीडित दांपत्याने ही जाहिरात पाहून फोन लावून चौकशी केली. त्यावेळी त्यांना तुमच्या मुलांच्या अभिनयाची झलक दाखवणारे व्हिडीओ पाठवण्यास सांगण्यात आलं. याला होम ऑडिशन असं नाव दिलं गेलं. त्यानंतर काही दिवसांनी याच व्हिडीओंसंदर्भात या दांपत्याला फोन आला.
होम ऑडिशनच्या नावाखाली घरीच शूट करुन या दांपत्याने पाठवलेले त्यांच्या मुलाच्या अभिनयाचे व्हिडीओ आमच्या टीमला आवडले असून तुमच्या मुलांची आम्ही निवड केली असल्याचं या सांगण्यात आलं. तुमच्या मुलांना भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची मुलगी झिवासोबत कॅडबरी ओरिओच्या जाहिरातासाठी निवडण्यात आलं आहे, असं या दांपत्याला सांगितलं केलं. त्यानंतर नोंदणी फी, प्रोसेसिंग फी असं सांगत जवळपास सव्वा लाख रुपये या दांपत्याकडून घेण्यात आले.
मात्र मुख्य शुटींग आणि इतर कसलाच पत्ता नसताना पुन्हा पैशांची मागणी करण्यात आल्याने दांपत्याला संशय आला आणि त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. या दांपत्यांने अरिहंत शेट्टी असं नाव सांगण्याच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली असून या आधारे फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस सध्या या व्यक्तीचा शोध घेत आहेत.
अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्यांची संख्या मागील काही काळापासून वाढली आहे. सायबर क्राइमबरोबरच अशाप्रकारे खोटे दावे करुन आर्थिक गंडा घालणाऱ्यांपासून सावध राहण्याचं आवाहन यंत्रणा आणि पोलिसांकडून वेळोवेळी केलं जातं.