Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'तिथे जाऊन खेळणार असाल तर..'; 2004 मध्ये टीम इंडिया पाकिस्तानला जाण्यापूर्वी वाजपेयींनी दिलेला सल्ला

Atal Bihari Vajpayee On Team India Visited Pakistan: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे क्रिकेट सामने म्हणजे कट्टर प्रतिस्पर्ध्यांशी सामना असं चित्र पाहायला मिळतं.

'तिथे जाऊन खेळणार असाल तर..'; 2004 मध्ये टीम इंडिया पाकिस्तानला जाण्यापूर्वी वाजपेयींनी दिलेला सल्ला

Atal Bihari Vajpayee On Team India Visited Pakistan: सध्या सुरु असलेली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं यजमान पद पाकिस्तानकडे आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून आयोजित केली जाणारी मालिका खेळवली जात आहे. 1996 साली पाकिस्तानने भारत आणि श्रीलंकेसहीत क्रिकेट वर्ल्ड कपचं आयोजन केलं होतं. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफी चषक स्पर्धेतील आठपैकी सात संघ पाकिस्तानमध्ये खेळणार असून भारतीय संघाचे सर्व सामने दुबईतील मैदानात होणार आहेत. भारताने सुरक्षेचं कारण देत पाकिस्तानमध्ये न जाण्याचा निर्णय घेतल्याने असं नियोजन करण्यात आलं आहे.

2006 पासून भारत-पाक सिरीज बंद

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात असल्याचं सिद्ध झाल्यानंतर भारतीय संघ कधीच पाकिस्तानमध्ये दौऱ्यासाठी गेलेला नाही. 2008 साली पाकिस्तानमध्ये आशिया चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र भारत या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये गेला नाही. भारत आणि पाकिस्तानमध्ये 2006 पासून एकदाही द्विपक्षीय मालिका खेळवण्यात आलेला नाही. 

जेव्हा भारतीय संघ पाकिस्तानात गेला होता

मात्र यंदा पुन्हा भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिल्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला जात आहे जेव्हा भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊन खेळला होता. भारतीय संघ 2004 साली जवळपास दहा वर्षानंतर पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. 1999 साली झालेल्या कारगील युद्धानंतर पहिल्यांदाच भारतीय संघ पाकिस्तानी दौऱ्यावर गेलेला. या दौऱ्यामध्ये सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग, अनिल कुंबळे यासारखे दिग्गज भारतीय संघाचा भाग होते. तर पाकिस्तानच्या संघात इंझमाम-उल-हक, मोहम्मद युसूफ, शोएब अख्तर, सकलेन मुश्ताकसारखे खेळाडू होते. मात्र या दौऱ्यावर जाण्यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी भारतीय संघाचा भेट घेऊन त्यांना एक खास संदेश दिला होता. वाजपेयी भारतीय संघाला काय म्हणाले होते याचा खुलासा सेहवागने एका मुलाखतीत केला आहे.

पाकिस्तानमध्ये जाणाऱ्या भारतीय संघाला वाजपेयी काय म्हणालेले?

वाजपेयी यांनी भारतीय संघाला पाकिस्तानी लोकांची मन जिंकून या असं सांगितलं होतं. "आम्ही पाकिस्तानला जाण्यासाठी निघण्यापूर्वी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची भेट घेतली. त्यांनी आम्हाला सांगितलं की हा 'मैत्रीपूर्ण' दौरा आहे. तुम्ही खेळात जिंका किंवा पराभूत व्हा याबद्दल मला काही ठाऊक नाही. मात्र तिथे जाऊन खेळणार असाल तर त्यांची मनं नक्की जिंकून या. पाकिस्तानी लोकांची मनं जिंकून या," असं तत्कालीन पंतप्रधान म्हणाल्याचं सेहवागने 'नेटफ्लिक्स'वरील 'द ग्रेटेस्ट रायव्हलरी: इंडिया व्हेर्सेस पाकिस्तान' या डॉक्युमेंट्रीमध्ये सांगितलं आहे.

भारताने या दौऱ्यातील 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका 3-2 अशी आणि तीन कसोटी सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली होती.

Read More