Champions Trophy Final Ind vs NZ: भारतीय संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात दाखल झाल्यानंतर फक्त दुबईत खेळत असल्याने त्यांना फायदा होत असल्याची एक सूर उमटला आहे. भारतीय संघाने सुरक्षेच्या कारणास्तव आणि केंद्र सरकारने नकार दिल्याने पाकिस्तानचा दौरा केला नाही. यामुळे भारताचे सर्व सामने दुबईत खेळवण्यात आले. त्यातच आता भारतीय संघ फायलनमध्ये पोहोचला असल्याने हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या अनेक खेळाडूंनी जाहीरपणे भारतीय संघावर टीका केली असताना आता पाकिस्तानच्याही माजी खेळाडूने टीका केली आहे. पाकिस्तानी खेळाडूने थेट आकडेवारीच मांडली आहे.
पाकिस्तान संघाचा माजी दिग्गज खेळाडू जुनैद खानने चॅम्पिअन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलने सामने खेळवणं भारताच्या यशाचं मुख्य कारण असल्याचं सांगितलं आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू झाल्यापासून भारताच्या तुलनेत न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांना किती प्रवास करावा लागला आहे, हे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूने पोस्टमध्ये सांगितलं आहे.
"चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी न्यूझीलंड संघाने 7150 किमी, दक्षिण आफ्रिकेने 3286 आणि भारताने 0 किमी प्रवास केला. काही संघ कौशल्याने तर काही संघ वेळापत्रकामुळे जिंकतात," असं जुनैद खानने पोस्टमध्ये लिहिलं आहे.