Champions Trophy 2025 India Vs Australia Semi Final: भारतासमोर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेत आज सर्वात मोठं आव्हान आहे. आज होणाऱ्या पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये भारताची गाठ ऑस्ट्रेलियाशी पडणार आहे. ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत केलं तरच रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला अंतिम सामना खेळता येणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयोजित केलेल्या म्हणजेच आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी फारशी समाधानकारक नाही. त्यामुळेच भारतीय चाहत्यांची धडधड वाढली असून आजच्या सामन्यात काय होणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच अनेकजण इतिहासात डोकावून भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा रेकॉर्ड कसा आहे याची चाचपणी करत आहेत. आपणही त्यावरच नजर टाकूयात...
भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाद फेरीमध्ये शेवटचा सामना 2011 साली जिंकला होता. भारताने एकदिवसीय वर्ल्ड कपच्या उपउपांत्यफेरीत म्हणजेच क्वार्टर-फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया पराभूत केलं होतं. हा वर्ल्डकप भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकला होता. मात्र त्यानंतर भारताला आयसीसीच्या एकही स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला पराभूत करता आलेला नाही. 2015 मध्ये भारत एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य सामना ऑस्ट्रेलियाविरुद्धच पराभूत झालेला.
2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारत एकही सामना पराभूत न होता अंतिम सामन्यात पोहोचला होता. मात्र अहमदाबादच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करत तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याच्या स्वप्नाला सुरुंग लावला. 2023 मध्ये एकदिवसीय वर्ल्डकपआधी भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभूत झाला होता. ही आयसीसीसीची दुसरी अशी टेस्ट चॅम्पियनशीप होती जिच्या फायनलमध्ये पोहोचून भारत पराभूत झालेला. पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये न्यूझीलंडंने भारताला पराभूत केलं होतं.
2023 मध्ये अहमदाबाद येथे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताला पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाइतका आताचा संघ ऑनपेपर तरी चांगला नाही. पॅट कमिन्स, मिचेल मार्श आणि जॉश हेजलवूड हे तीन महत्त्वाचे गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. मिचेल स्टार्क खासगी कारणामुळे ही स्पर्धा खेळत नसून मार्कस स्टॉनिसने ही स्पर्धा सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला अचानक निवृ्त्ती जाहीर केली.
2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं. 2007 च्या पहिल्याच टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 15 धावांनी पराभूत केलेलं. 2011 च्या एकदिवसीय क्रिकेटच्या वर्ल्डकपमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला जे करायला जमलं ते आज रोहितच्या नेतृत्वाखाली करायला जमेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलियात आतापर्यंत आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये बाद फेरीत किंवा अंतिम असे सात सामने झाले असून त्यापैकी चार ऑस्ट्रेलियाने तर तीन भारताने जिंकले आहेत.
27 वर्षांपूर्वी म्हणजेच 1998 साली भारताने ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पराभूत केलेलं. 1998 साली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बाद फेरीत पराभूत केलं होतं. तो सामना भारताने 44 धावांनी जिंकला होता.
2003 च्या एकदिवसीय सामन्यांच्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला 125 धावांनी पराभूत केलं होतं.
2007 च्या पहिल्याच टी-20 वर्ल्डकपमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 15 धावांनी पराभूत केलेलं.
भारताने 2011 च्या वर्ल्डकपमध्ये उपउपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्स राखून धूळ चारली होती.
2023 साली झालेली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 209 धावांनी पराभूत केलेलं.
ऑस्ट्रेलियाने 2023 चा एकदिवसीय वर्ल्डकप भारताविरुद्ध अंतिम सामना खेळताना 6 विकेट्सने जिंकला होता.