Video Pakistani Boy On Who Is Virat Kohli: पाकिस्तानमध्ये 29 वर्षानंतर पहिल्यांदाच सध्या सुरु असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या माध्यमातून अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून खेळवणारी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या स्पर्धेमध्ये पहिल्या दोन सामने पराभूत होऊन पाकिस्तानचा यजमान संघ स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे. पाकिस्तानने अवघ्या चार दिवसात या स्पर्धेतून गाशा गुंडाळल्याने पाकिस्तानी चाहते चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानने स्पर्धेतील पाहिला न्यूझीलंडविरुद्धचा सामना 60 धावांनी तर दुसरा भारताविरूद्धचा सामना सहा विकेट्सने गमावला. रावळपिंडीमध्ये सतत पाऊस पडत असल्याने 27 तारखेचा बांगलादेशविरुद्धचा सामना रद्द झाल्याने पाकिस्तान आणि बांग्लादेश सेमी-फायनलच्या शर्यतीमधून बाहेर पाडले आहेत. पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर पडण्याबरोबरच भारताविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने केलेला सुमार खेळ पाकिस्तानी चाहत्यांच्या पार डोक्यात गेलाय. सध्या याच पाकिस्तानी संघाच्या कामगिरीवर तेथील लोक किती भडकलेत याची झळक दाखवणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पाकिस्तानचा संघ भारताविरुद्ध पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांपासून सोशल मिडियापर्यंत सगळीकडेच संघातील खेळाडूंची खिल्ली उडवली जात आहे. पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांची निराशा इतकी आहे की भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्धचा सामना भारताला जिंकून देताना चौकाराच्या माध्यमातून विजय साकारताना शतक झळकावल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी त्यांच्या देशात सेलीब्रेशन केल्याचे व्हिडीओही समोर आले आहेत. दुबईच्या मैदानात पाकिस्तानला पराभूत होताना पाहिल्यावर वाईट वाटण्याबरोबरच विराटची खेळी पाहून चाहते म्हणून समाधान मिळाल्याचं अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी मैदानाबाहेर पडताना म्हटलं. तसेच अनेकांनी बाबर आझम हा किंग नसून विराट कोहलीच खरा किंग आहे, असं म्हटलं. जो संघासाठी गरजेच्या वेळी उभा राहू शकतो तो खेळाडू कौतुकास पात्र असतो असंही अनेक पाकिस्तानी चाहत्यांनी विराटचं कौतुक करताना आणि बाबारला टार्गेट करता म्हटलं.
भारत पाकिस्तान सामन्यानंतर अनेक ट्रोलिंगचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अनेक व्हिडीओ मिम्स प्रकारात तयार करण्यात आले असले तरी काही व्हिडीओ हे केवळ पाकिस्तानच्या चाहत्यांची निराशा दाखवतानाच भारतीय चाहत्यांना हसवत आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये भारतीय पत्रकार पाकिस्तानमध्ये विराटची प्रचंड क्रेझ असल्याचं सांगतो. त्यानंतर बाजूला उभ्या असलेल्या एका क्रिकेटप्रेमी पाकिस्तानी मुलाला विराट कोहली कोण आहे माहितीये का? असं विचारतो. त्यावर तो मुलगा, "होय किंग कोहली, नुकताच त्याने 14 हजार धावांचा विक्रम केला," असं उत्तर देता. पत्रकार पुढचा प्रश्न विचारण्याआधीच विराटची ओळख सांगताना हा पाकिस्तानी मुलगा विराटचा उल्लेख चक्क, 'आझम (बाबर आझम का बाप,' असा करतो. हा व्हिडीओ भारतीय चाहते सध्या तुफान व्हायरल करत आहेत. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ....
अनेकांनी या मुलाला क्रिकेटचं खरं ज्ञान आहे असं म्हटलं आहे. तर काहींनी संपूर्ण भारतीय उपखंडात क्रिकेटचं ज्ञान असलेल्यांचं या मुलाप्रमाणेच म्हणणं असल्याची प्रतिक्रिया नोंदवत बाबरला ट्रोल केलं आहे.