Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Champions Trophy: 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे', म्हणणाऱ्या योगराज सिंग यांना वसीम अक्रमने दिलं उत्तर, 'तुम्ही असला उद्धटपणा...'

वसीम अक्रम, शोएब अख्तर आणि पाकिस्तानचे इतर दिग्गज पाकिस्तानी खेळाडूंना मदत करण्याऐवजी त्यांचा अपमान करत आहेत अशा शब्दांत योगराज सिंग यांनी सुनावलं होतं.   

Champions Trophy: 'तुम्हाला लाज वाटली पाहिजे', म्हणणाऱ्या योगराज सिंग यांना वसीम अक्रमने दिलं उत्तर, 'तुम्ही असला उद्धटपणा...'

चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब कामगिरीनंतर त्यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत आहे. वसीम अक्रम, शोएब अख्तर यांच्यासारखे दिग्गज खेळाडू पाकिस्तान संघाला खडेबोल सुनावत आहेत. शोएब अख्तरने तर आता आपल्याला बोलायची इच्छाच नाही अशी खंत व्यक्त केली आहे. पण यादरम्यान हे सर्व दिग्गज खेळाडू संघाला मदत करण्याऐवजी फक्त टीका करण्यात व्यग्र आहेत असाही एक सूर आहे. पडद्यामागे बसून टीका करण्याऐवजी त्यांनी पुढाकार घेत संघाला प्रशिक्षण द्याव असं मत व्यक्त होत आहे. यादरम्यान भारतीय संघाचे माजी क्रिकेटर आणि युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी वसीम अक्रम, शोएब अख्तर आणि इतरांना तुम्ही टीका करण्याऐवजी खेळाडूंना मदत का करत नाही? अशी विचारणा केली आहे. 

'ड्रेर्सिंग रुम'मध्ये चर्चा करताना वसीम अक्रमला हाच प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्याने सडेतोड उत्तर दिलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक मोठं नाव असणाऱ्या वसीम अक्रमने यावेळी वकार युनिसचं उदाहरण दिलं. पाकिस्तानचे दिग्गज खेळाडू जेव्हा कोचिंगचं पद घेतात तेव्हा त्यांचा कशाप्रकारे अपमान केला जातो हे वसीम अक्रमने सांगितलं आहे. 

"लोक एकतर माझ्यावर टीका करत असतात किंवा मग फक्त माझ्याबद्दल बोलत असतात. जेव्हा मी सर्व पाकिस्तानी प्रशिक्षकांना पाहतो तेव्हा वकारचं उदाहरण दिसतं. त्याला कोच झाल्यानंतर अनेकदा त्या पदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. तुम्ही लोक फार उद्धटपणा करतात. मी ते सहन करु शकत नाही," असं वसीम अक्रमने म्हटलं आहे.

योगराज सिंग यांनी म्हटलं आहे की, वसीम अक्रम आणि शोएब अख्तर कार्यक्रमात बसून पाकिस्तान संघाबद्दल वाईट बोलत असतात, पण कोचिंग कॅम्पमध्ये जाऊन त्यांना मदत करण्याचा विचार करत नाहीत. वसीम अक्रमने या टीकेला उत्तर देताना सांगितलं की, मी संघाला फुकटात प्रशिक्षण देण्यास तयार आहे, पण त्याच्यासोबत येणारी नकारात्मक चर्चा मला नको आहे. वसीम अक्रमला वयाच्या 58 व्या वर्षी कोणताही ताण न येता मिळणारं आयुष्य जगण्याची इच्छा आहे. 

"मला पाकिस्तान संघाला मदत करायची आहे. तुम्हाला मला पैसे का द्यायचे आहेत. मी फुकटात उपलब्ध आहे. जर तुम्ही कॅम्प लावला आणि माझी तिथे गरज असेल तर मी येईन. जर  तुम्हाला मोठ्या स्पर्धेआधी मी खेळाडूंसोबत वेळ घालवावा असं वाटत असेल तर ते मी करु शकतो. पण मी आता 58 वर्षाचा असून, तुम्ही करता तो अपमान सहन करु शकत नाही. मी या वयात तणावग्रस्त आयुष्य जगू शकत नाही," असंही त्याने सांगितलं.

Read More