Chinnaswamy Stadium Stampede Case: कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेसच्या इंदिरा भवन मुख्यालयात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली. 4 जून रोजी इंडियन प्रिमिअर लीगमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या विजयानंतर आयोजित कार्यक्रमात बेंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियमजवळ झालेल्या चेंगराचेंगरीबाबत दोन्ही नेत्यांनी वरिष्ठांना स्पष्टीकरण दिले. या दुर्घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात कोणतीही हलगर्जी न करण्याची ताकीद हायकमांडने दोन्ही नेत्यांना दिल्याचे समजते. दोन्ही नेत्यांना पक्षनेतृत्वाने दिल्लीत पाचारण केल्याने सिद्धरामय्या यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची आता शिवकुमार यांच्याकडे जाणारच, अशी चर्चा होती. मात्र तूर्तास केवळ ताकीद मिळून खुर्ची वाचल्याचे समजते. भविष्यात अशी दुर्घटना घडू नये याची काळजी घेण्याचा इशारा काँग्रेस हायकमांडने सिद्धरामय्या यांना दिल्याचेही समजते.
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयपीएलमध्ये विजेते ठरलेल्या आरसीबी संघाच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी झालेल्या कार्यक्रमात क्रिकेटपटूंना पाहण्यासाठी प्रचंड मोठी गर्दी जमली होती. यादरम्यान चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला व 56 जण जखमी झाले होते. भाजप आणि केंद्रीय मंत्री कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष जनता दलाने या दुर्घटनेसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना जबाबदार धरत दोघांचाही राजीनामा मागितला होता. मात्र राज्य सरकारने हा कार्यक्रम आयोजित केला नव्हता व त्यांना याबाबत उशिरा कळवण्यात आले, असे सांगून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी हात झटकले होते. भाजपनेही या प्रकरणानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली होती. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही 13 जूनपासून आंदोलन करु असा इशारा भाजपाने दिला आहे.
काँग्रेस अध्यक्ष खर्गे यांनी या चेंगराचेंगरीचा सविस्तर अहवाल मागितला होता. 'आरसीबीच्या विजयोत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनाही हायकमांडने दिल्लीत बोलावून घेतले आहे. राज्य सरकारकडून काही निष्काळजी झाली आहे का, याची चौकशी केली जात आहे. अंतिम चौकशी अहवाल आल्यानंतर सत्य बाहेर येईल,' असे कर्नाटकचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी या भेटीपूर्वी सांगितले.
दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाबरोबर जनगणना, पक्षसंघटनेतील नवीन नियुक्त्या, मंत्रिमंडळातील प्रस्तावित फेरबदल, जिल्हाध्यक्षांची निवड आदी मुद्द्यांवरही चर्चा केल्याचे पक्षसूत्रांनी सांगितले. कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीला अद्याप किमान अडीच वर्षे बाकी आहेत. तेथे आताच नेतृत्वबदल करून कोणताही संदेश देण्यास काँग्रेस नेतृत्व तयार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.