Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

सचिन-लक्ष्मण अडचणीत, बीसीसीआयच्या लोकपालची नोटीस

सौरव गांगुलीनंतर आता सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे दोन्ही माजी क्रिकेटपटू अडचणीत आले आहेत.

सचिन-लक्ष्मण अडचणीत, बीसीसीआयच्या लोकपालची नोटीस

मुंबई : सौरव गांगुलीनंतर आता सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे दोन्ही माजी क्रिकेटपटू अडचणीत आले आहेत. कथित हितसंबंधांवरून बीसीसीआयचे लोकपाल डीके जैन यांनी सचिन आणि लक्ष्मण यांना नोटीस पाठवली आहे. आयपीएलमध्ये सचिन हा मुंबईचा मेंटर तर लक्ष्मण हा हैदराबादचा मेंटर आहे. याचबरोबर हे दोघं बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचेही सदस्य आहेत.

परस्पर हितसंबंधांबद्दलचा (कॉनफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट) हा तिसरा आरोप आहे. याआधी सौरव गांगुली हा बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीचा सदस्य, बंगाल क्रिकेटचा अध्यक्ष आणि आयपीएलच्या दिल्ली टीमचा मेंटर अशा तीन भूमिकांमध्ये असल्यामुळे त्याच्याविरुद्ध लोकपालमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीनंतर गांगुलीला लोकपाल डीके जैन यांच्यासमोर झालेल्या सुनावणीसाठी हजर राहावं लागलं होतं.

गांगुली, तेंडुलकर आणि लक्ष्मण या तिघांच्या क्रिकेट सल्लागार समितीने जुलै २०१७ साली भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची निवड केली होती. यानंतर या तिघांची एकही बैठक झालेली नाही.

डीके जैन यांनी लक्ष्मण आणि तेंडुलकर यांना २८ एप्रिलपर्यंत आरोपांवर लिखित उत्तर द्यायला सांगितलं आहे. मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन(एमपीसीए)चे सदस्य संजीव गुप्ता यांनी केली आहे.

लोकपालला उत्तर देण्यात अयशस्वी ठरले तर या दोघांना पुन्हा आपला विचार मांडण्याची कोणतीही संधी मिळणार नाही. याबद्दल अजून सचिन आणि लक्ष्मण यांची प्रतिक्रिया आलेली नाही. तर सौरव गांगुलीने याप्रकरणानंतर सल्लागार समितीचा राजीनामा द्यायची तयारी दाखवली होती.

 

Read More