Hasin Jahan serious allegation on Mohammed Shami: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्यातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने या प्रकरणात मोठा निर्णय देत शमीला दरमहा तब्बल 4 लाख रुपयांचा भरणा करण्याचे आदेश दिले आहेत. हसीन जहाँ आणि त्यांच्या मुलीच्या खर्चासाठी शमीला ही रक्कम दर महिन्याला द्यावी लागणार आहे. याआधी शमी दरमहा 50 हजार हसीनसाठी आणि 80 हजार मुलीसाठी, असा एकूण 1.3 लाख रुपयांचा भत्ता देत होता. मात्र आता कोर्टाने या आदेशात बदल करत ही रक्कम वाढवली आहे.
या निकालानंतर हसीन जहाँ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “मी गेली सात वर्षे न्यायासाठी लढतेय. शमीने कधीही विचारपूस केली नाही. उलट माझ्या विरोधात भ्रष्ट अधिकाऱ्यांना पैसे देऊन कारवाया केल्या. मला त्रास देण्याचा प्रयत्न केला. पण कोर्टाने अखेर माझ्या बाजूने निर्णय दिला. हा माझा हक्क आहे. न्यायालयाने शमीच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचा विचार करूनच हा निर्णय दिला आहे.”
हसीन जहाँ यांनी कोर्टात दरमहा 10 लाख रुपयांची मागणी केली होती. त्या 10 लाख रुपयात 7 लाख स्वतःसाठी आणि 3 लाख मुलीसाठी. मात्र कोर्टाने ही रक्कम 4 लाख रुपये अशी ठरवली आहे.
या निर्णयामुळे आता शमीला मागील सात वर्षांचा एकूण अंदाजे 3 कोटी रुपयांचा भरणा करावा लागणार आहे. कोर्टाने शमीची आर्थिक स्थिती लक्षात घेऊन निर्णय घेतला आहे. सध्या शमीची वार्षिक कमाई सुमारे 7 कोटी रुपये असून त्याचा महिन्याचा उत्पन्न जवळपास 60 लाख रुपये आहे.
हे ही वाचा: वेस्टइंडीज क्रिकेटरवर 11 महिलांच्या बलात्काराचा आरोप; मुख्य प्रशिक्षक म्हणाले, ' मी जज नाही. पण...'
शमी आणि हसीन जहाँ यांचा वाद 2018 पासून सुरू आहे. दोघांचे 2014 मध्ये लग्न झाले होते आणि 2015 मध्ये त्यांना एक मुलगी झाली. मात्र 2018 मध्ये हसीन जहाँ यांनी शमीवर अनैतिक संबंध, घरगुती हिंसा आणि मॅच फिक्सिंगसारखे गंभीर आरोप केले. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि आजतागायत सुरू आहे.