Monank Patel Life Story: यश असं सहजासहजी मिळत नाही, यासाठी खूप काही गमवावं लागतं, मोठे त्याग करावे लागतात. भारतीय क्रिकेटमध्येही हेच वास्तव आहे. लाखो मुलं क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहतात, पण त्या स्वप्नापर्यंत पोहोचणं सोपं नाही. पण काही खेळाडू असेही असतात जे परिस्थितीवर मात करून वेगळा मार्ग शोधतात. असंच एका खेळाडूची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत.
आज आपण मोनांक पटेलची यशोगाथा जाणून घेणार आहोत. गुजरातच्या आणंदमध्ये 1 मे 1993 ला जन्मलेल्या मोनांक पटेलने लहानपणापासून क्रिकेटर होण्याचं स्वप्न पाहिलं. त्याने गुजरातच्या अंडर-16 आणि अंडर-18 संघाकडून क्रिकेट खेळलं. या काळात त्याचे टीममेट होते जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल हे दमदार खेळाडू.
2010 साली मोनांकला अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालं होतं. भारतात अंडर-19 पातळीवर फारसं यश न आल्यामुळे त्याने 2016 मध्ये अमेरिकेत कायमचं राहायचं ठरवलं. तिथं त्याने ‘टेरीयाकी मॅडनेस’ नावाचं एक चायनीज रेस्टॉरंट सुरू केलं. जवळपास दोन वर्ष तो दररोज 10-12 तास रेस्टॉरंटमध्ये काम करत होता. कधी कधी कस्टमर नव्हते, त्यामुळे स्टाफ तो घेऊ शकत न्हवता. त्यामुळे त्याला मॅनेजरपासून शेफपर्यंत सगळं काम स्वतःलाच करावं लागत होतं.
मोनांकच्या आयुष्यात मोठा धक्का तेव्हा बसला, जेव्हा त्याला कळलं की त्याच्या आईला कॅन्सर झाला आहे. त्यामुळे त्याने शेवटी रेस्टॉरंट विकायचा निर्णय घेतला. त्याच्या बँक खात्यात फक्त 3000 डॉलर उरले होते. आईकडे न्यू जर्सीमध्ये परतून तो तिची देखभाल करू लागला.
याच दरम्यान अमेरिकेचे माजी प्रशिक्षक पुबुदु दसनायके यांनी मोनांकचं बॅटिंगचा एक व्हिडीओ पाहिला आणि त्याला त्वरित काही मॅच खेळायला बोलावलं. मोनांकने ही संधी साधली आणि त्याचं अमेरिकन संघात दार उघडलं.
2019 मध्ये मोनांक पटेलने अमेरिकेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2021 मध्ये त्याच्याकडे अमेरिकेच्या पुरुष संघाची कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्याने 13 सप्टेंबर 2021 ला नेपाळविरुद्ध शानदार शतक ठोकलं. 2022 मध्ये त्याने दुसरं वनडे शतक झळकावलं, तर 2024 मध्ये नाबाद 121 धावांची खेळी केली.
त्याने आतापर्यंत 67 वनडे सामने खेळले असून, 35.35 च्या सरासरीने 2192 धावा केल्या आहेत. त्यात 3 शतके आणि 17 अर्धशतके समाविष्ट आहेत. टी-20 मध्ये त्याने 43 सामने खेळले असून, 920 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 6 अर्धशतके आहेत. आज मोनांक पटेल अमेरिकेचा नियमित कर्णधार असून, बुमराह-अक्षर पटेल यांच्यासोबत कधी टीममेट असलेला हा खेळाडू आता अमेरिकन क्रिकेटचा चेहरा बनला आहे.