Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'जेव्हा वाटेल तेव्हा निवृत्ती घेणं...', रोहित शर्माच्या निर्णयावर दिनेश कार्तिक स्पष्टच बोलला, 'हे आता स्पष्टच दिसतंय...'

रोहित शर्माने (Rohit Sharma) आपण निवृत्ती घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. रोहित शर्माने चॅम्पिअन्स ट्रॉफी (Champions Trophy) जिंकल्यानंतर आपण निवृत्ती घेणार या फक्त अफवा असल्याचं स्पष्ट केलं आहे.   

'जेव्हा वाटेल तेव्हा निवृत्ती घेणं...', रोहित शर्माच्या निर्णयावर दिनेश कार्तिक स्पष्टच बोलला, 'हे आता स्पष्टच दिसतंय...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) निवृत्त होणार नाही हे आता स्पष्ट झालं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील सुमार कामगिरीमुळे रोहित शर्माने आता निवृत्ती घ्यावी अशी मागणी होत होती. तर दुसरीकडे चॅम्पिअन्स ट्रॉफीचा निकाल काही असला तरी रोहित शर्मा निवृत्ती घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण रोहित शर्माने स्वत:च या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. चॅम्पिअन्स ट्रॉफी जिंकल्यानंत पत्रकार परिषदेत रोहित शर्माने सांगितलं की, "मी या फॉरमॅटमधून निवृत्त होणार नाही. कोणत्याही अफवा पुढे पसरु नयेत यासाठी मी खात्री करत आहे. भविष्याबद्दल काही योजना नसून, जे सुरु आहे ते तसंच सुरु राहील". 

दिनेश कार्तिकने रोहित शर्माच्या निवृत्तीसंबंधीच्या विधानावर भाष्य केलं आहे. "रोहित शर्मा एक व्यक्ती म्हणून नेमका कसा आहे हे यावरुन स्पष्ट दिसत आहे. खूप विनोदी आहे, पण त्याच वेळी एक संदेश पाठवत आहे की, माझ्या निवृत्तीबद्दल फार घाई करु नका. जेव्हा मला वाटेल तेव्ही मी करेन," असं दिनेश कार्तिकने Cricbuzz शी संवाद साधताना म्हटलं.

त्याने विराट कोहलीचंही कौतुक केलं. "मोठ्या सामन्यात चांगली कामगिरी करण्यासाठी नेमकं काय लागतं हे त्यांना माहिती आहे. खेळापूर्वी, खूप विचार येत असतात. पण ते ज्या पद्धतीने त्या विचारांना दिशा देतात आणि त्या उर्जेचा मैदानावर वापर करतात तेच त्यांना खास बनवते," असं दिनेश कार्तिक म्हणाला. जैसवाल हा एक उत्तम ओपनर आहे. जेव्हा त्याला संधी मिळेल तेव्हा तो जबरदस्त कामगिरी करेल असंही त्याने म्हटलं.

एका रिपोर्टनुसार, रोहित शर्माने 2027 च्या विश्वचषकापर्यंत खेळण्याची योजना आधीच आखील आहे. "जर गोष्टी योजनेनुसार राहिल्या तर, दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणाऱ्या आयसीसी स्पर्धेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो," असं क्रिकबझमधील रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

रोहित शर्मा दोन महिन्यांत 38 वर्षांचा होईल आणि 2027 चा एकदिवसीय विश्वचषक सुरू होईपर्यंत तो 40 वर्षांचा असेल. अहवालानुसार, रोहित भारतीय क्रिकेट संघाचा सध्याचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याच्यासोबत आपला फिटनेस, फलंदाजी यावर काम करणार आहे. 2025 पासून 2027 च्या विश्वचषकापर्यंत, भारत 27 एकदिवसीय सामने खेळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान रोहित शर्माला 2027 चा वर्ल्डकप खेळणार का? असं विचारण्यात आलं असता त्याने सांगितलं की, "हे आताच सांगणं फार कठीण आहे. पण मी माझे सर्व पर्याय खुले ठेवत आहे. मला मी किती चांगला खेळतो हे पाहायचं आहे". पुढे तो म्हणाला की, "सध्या मी खूप चांगला खेळत आहे. मी संघासह जे काही करत आहे त्या सगळ्याचा आनंद घेत आहे. संघालाही माझी साथ आवडत आहे, जी चांगली गोष्ट आहे. मी 2027 बद्दल खात्रीशीरपणे काही सांगू शकत नाही. पण मी माझे सर्व पर्याय खुले ठेवले आहेत".

Read More