Dipendra Singh Airee, Asian Games 2023: सध्या सुरू असलेल्या आशियन गेम्स 2023 मध्ये नेपाळ आणि मंगोलिया (Nepal vs Mongolia) यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यात विक्रमांची हांडी मोडली गेलीये. आशियन गेम्सला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दर्जा दिला गेल्याने स्टार खेळाडू युवराज सिंह (Yuvraj Singh) याचा विक्रम मोडला गेला आहे. नेपाळचा फलंदाज दीपेंद्र सिंग ऐरी (Dipendra Singh Airee) याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावून भारताचा माजी दिग्गज युवराज सिंगचा विक्रम मोडला. युवराजने इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं होतं, मात्र दीपेंद्रने अवघ्या 9 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलंय. त्यामुळे सध्या त्याचं कौतुक होताना दिसत आहे.
दीपेंद्र सिंग ऐरीने 520 च्या स्ट्राइक रेटने 10 चेंडूत नाबाद 52 धावा केल्या. त्याच्या खेळीत 8 सिक्सचा समावेश होता. पहिल्याच 5 बॉलवर सिक्स खेचत त्याने सर्वांच्या मनात धडकी भरवली. मात्र, सहावा बॉलवर त्याला सिक्स मारता आला नाही. त्याशिवाय, कुशल मल्लाने संघासाठी 274 च्या स्ट्राईक रेटने 50 चेंडूत 137 धावांची खेळी केली. कुशलच्या या खेळीत 8 चौकार आणि 12 षटकारांचा समावेश होता. दीपेंद्रने रेकॉर्ड केलाच पण कुशल देखील टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज ठरला आहे.
Dipendra Singh Airee's fastest ever fifty in T20i history:
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 27, 2023
6,6,6,6,6,2,6,6,6.
- A memorable day for Nepal cricket!pic.twitter.com/ih9cvYehCi
दरम्यान, टी-ट्वेंटी सामन्यात नेपाळने प्रथम फलंदाजी करताना 314 धावांचा डोंगर उभा केला आहे. या डावात नेपाळच्या फलंदाजांनी तब्बल 26 सिक्स अन् 14 फोर खेचले. दीपेंद्र सिंग ऐरी 23 वर्षांचा आहे. त्याचा जन्म 24 जानेवारी 2000 रोजी झाला होता. तो नेपाळच्या संघात मधल्या फळीतील फलंदाज म्हणून खेळतो.त्याने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी पदार्पण केलं. पण नेपाळला 2018 मध्ये वनडे खेळण्याचा दर्जा मिळाल्यानंतर तो मुख्य संघाचा भाग बनला.