Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

राज ठाकरे ते पंतप्रधान मोदी... दिव्या देशमुखवर राजकीय शुभेच्छांचा वर्षाव

१९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं आहे. 

राज ठाकरे ते पंतप्रधान मोदी... दिव्या देशमुखवर राजकीय शुभेच्छांचा वर्षाव

जॉर्जियातील बटुमी इथे खेळल्या गेलेल्या 2025 च्या FIDE बुद्धिबळ विश्वचषकात विजेतेपदावर आपले नाव कोरून संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावणारी दिव्या देशमुखची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. दिव्या देशमुखवर सध्या राजकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे संवाद साधत तिचे अभिनंदन केले! केवळ नागपूर आणि महाराष्ट्रासाठी नाही, तर संपूर्ण देशासाठी हा आनंदाचा आणि गौरवाचा क्षण असल्याचे त्यांनी तिला सांगितले. युवकांसाठी प्रेरणादायी ठरलेली तिची कामगिरी अशीच यशाची नवनवीन शिखरे गाठत राहो, यासाठी श्री गडकरीजी यांनी दिव्याला शुभेच्छा दिल्या आहेत. 

राज ठाकरेंकडून शुभेच्छा

मनसे नेते राज ठाकरे यांच्याकडून दिव्या देशमुखला शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 19 वर्षीय दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या विश्वचषक स्पर्धेत विश्वविजयपद मिळवलं आहे. अवघ्या १९ वर्षाच्या मराठमोळ्या दिव्या देशमुखने बुद्धिबळाच्या (FIDE) विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच कोनेरू हंपीला हरवून विश्वविजयपद मिळवलं. दोन भारतीय महिला बुद्धिबळाच्या पटावर विश्वविजयासाठी चाली रचत आहेत हे दृश्यच खूप सुंदर आहे. आणि कुठल्याही परिस्थितीत भारताकडेच विश्वविजय पद आलं असतं हा देखील आनंदाचा भाग. पण दिव्याचं मनापासून अभिनंदन. या निमित्ताने अधिकाधिक महिला बुद्धिबळपटू तयार होऊ देत, त्यांना विजयाला गवसणी घालण्याची प्रेरणा मिळू दे हीच इच्छा... महाराष्ट्राकडे बुद्धी आणि बळ दोन्ही ओतप्रोत आहे, ते जेंव्हा जेंव्हा महाराष्ट्राचं नाव मोठं करायला वापरलं जातं तेंव्हा खूप आनंद होतो. दिव्या तुझं पुन्हा एकदा अभिनंदन...

मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा

दिव्याने वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी हा कामगिरी केली आणि इतिहास घडवला. दिव्याच्या या कामगिरीनंतर तिचं अभिनंदन केलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या या मुलीचं पत्रकार परिषद घेत अभिनंदन केलं. फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेत खेळाडूंसाठी काही नवीन योजना राबवता येतील काही हे पाहू, असंही म्हटलं. तसेच मुख्यमंत्र्यांनी दिव्याबाबत मोठी घोषणा केली.

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

सोमवारी जॉर्जियातील बटुमी येथे अनुभवी देशबांधव कोनेरू हम्पीवर टायब्रेकरमध्ये विजय मिळवून दिव्याने तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा गाठला. मोदींनी 'एक्स' वर लिहिले, 'दोन उत्कृष्ट भारतीय बुद्धिबळपटूंमधील ऐतिहासिक अंतिम सामना. २०२५ मध्ये FIDE महिला जागतिक बुद्धिबळ विजेती बनलेल्या तरुण दिव्या देशमुखचा अभिमान आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल तिचे अभिनंदन. यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळेल.' 

मोदी म्हणाले की, अंतिम फेरीत दिव्याची प्रतिस्पर्धी कोनेरू हम्पीनेही संपूर्ण चॅम्पियनशिपमध्ये असाधारण कौशल्य दाखवले. ते म्हणाले, 'दोन्ही खेळाडूंना त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.' या विजयाने १९ वर्षीय दिव्याला प्रतिष्ठित जेतेपद मिळवून दिले आणि तिला ग्रँडमास्टर देखील बनवले, जे स्पर्धेच्या सुरुवातीला अशक्य वाटत होते.

Read More